भोर प्रतिनिधी – स्वप्नीलकुमार पैलवान
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांद खालचे, ता . भोर येथे शालेय वर्गातील नव्याने साकार झालेल्या बोलक्या भिंती व वॉल कंपाउंड वरील स्प्रे पेंटिंग चित्रांचे उद्घाटन सायबेज आशा फाउंडेशनचे इव्हेंट मॅनेजर राकेश कांबळे यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी भोर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी भगवान कानडे, भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष सुदाम ओंबळे, भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे माजी सरचिटणीस पंडित गोळे, केंद्राचे केंद्रप्रमुख सखाराम बलकवडे, परशुराम लडकत नांदगावचे ग्रामस्थ, महिला तसेच पालक शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, स्वराज युवा फाउंडेशन चे सर्व सदस्य उपस्थित होते. भोर तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे (केळकर) यांच्या मार्गदर्शनाने स्वानंदी शिक्षण संविधान शिक्षण याबाबत शाळेने राबवलेल्या उपक्रमांची माहिती शाळेचे उपशिक्षक अविनाश कुचेकर यांनी दिली.


भाषा, गणित, इंग्रजी पेटीतील साहित्य मांडणी ज्ञानरचनावाद संगणक शिक्षक या उपक्रमांची उपस्थिततानी पाहणी केली. पेरणी काव्यसंग्रहाचे संपादक परशुराम लडकत त्यांच्या स्वरचित कविता बाप व नारी तसेच वऱ्हाडी भाषेतील कविता व नव्या युगातील शाळा माझी या कविता सादर केल्या.

शाळेमध्ये राबवत असलेल्या सर्व उपक्रमामुळे भोर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात एक आदर्श शाळा निर्माण झाल्याचे मत पंडित गोळे यांनी व्यक्त केले. सायबेज आशा ही ग्रामीण भागात शैक्षणिक व आरोग्य विषयक कार्य करणारी संस्था असून नांद गावात केलेल्या कार्याची माहिती राकेश कांबळे यांनी दिली. भविष्यकाळात इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व प्राथमिक शाळांना व शिक्षकांना आदर्श मॉडेल स्कूल म्हणून नांद खालचे प्राथमिक शाळा मार्गदर्शक ठरू शकते असे मत भगवान कानडे व्यक्त केले.
माऊली दुधाणे यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन अविनाश कुचेकर यांनी तर आभार रमेश दुधाणे यांनी मानले.





