सांगली (विशेष प्रतिनिधी) :
ग्रामीण तसेच डिजिटल माध्यमात कार्यरत पत्रकारांनी बदलत्या काळानुसार संघटित होणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत ‘व्हॉईस ऑफ मीडिया – व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’चे डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष इरशाद शेख यांनी व्यक्त केले. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या राज्यव्यापी दौऱ्याच्या निमित्ताने सातारा येथे आयोजित पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.

इरशाद शेख म्हणाले की, आज पत्रकारितेचे स्वरूप वेगाने बदलत आहे. डिजिटल माध्यमांचा प्रभाव वाढत असताना या क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना विविध आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत सर्व पत्रकारांनी एकत्र येऊन संघटनात्मक बळ वाढविणे गरजेचे आहे. डिजिटल पत्रकारांना योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि संरक्षण मिळाले तरच या क्षेत्रातील पत्रकारिता अधिक सक्षम होईल.

यावेळी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे राज्य कार्याध्यक्ष विजय चोरडिया यांनी सांगितले की, गावागावातील पत्रकार विविध समस्यांना सामोरे जात आहेत. पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळ, पेन्शन योजना, घरकुल योजना तसेच अधिस्वीकृतीचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी संघटना सातत्याने प्रयत्नशील आहे. ग्रामीण पत्रकार आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला तरच लोकशाही अधिक बळकट होईल, असेही त्यांनी नमूद केले.
तसेच पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख सचिन मोहिते यांनी विभागातील संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेत पत्रकारांनी एकजुटीने संघटनेच्या माध्यमातून काम करण्याचे आवाहन केले. ग्रामीण आणि डिजिटल पत्रकारांना एकत्र आणून संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

हा दौरा पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथे यशस्वीरीत्या संपन्न झाला. या दौऱ्याच्या माध्यमातून पत्रकारांच्या समस्या जाणून घेणे, संघटनात्मक रचना अधिक मजबूत करणे आणि पत्रकारांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे हा प्रमुख उद्देश असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी सांगली येथे डिजिटल विंगचे प्रदेश उपाध्यक्ष नित्त्यानंद कुंभार, सांगली जिल्हाध्यक्ष सुर्यकांत कुकडे, गणेश आवळे, अल्ताफ खतीब, मल्हारी ओमासे आदी पदाधिकारी इचलकरंजी येथे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष साईनाथ जाधव, स्वनिल कांबळे,ओंकार पोतदार आदी पदाधिकारी तसेच सातारा येथे जिल्हाअध्यक्ष अनिल करंदकर, उत्तर विभाग जिल्हाध्यक्ष समद अत्तार, दक्षिण विभाग जिल्हाध्यक्ष मोहन बोरकर, कार्याध्यक्ष शिवाजी निकम आदी पदाधिकारी उपस्थित होते.





