विठ्ठल वळसे पाटील लिखित निसर्ग दाता पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
कोरेगाव भिमा : गजानन गव्हाणे पाटील
नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये सोडल्या गेलेल्या प्रदुषित घटकांमुळे जलपर्णी फोफावून जैवविविधतेचा ऱ्हास होत आहे. तो रोखण्यासाठी प्रत्येकाला जलसाक्षर होणे काळाची गरज आहे असे मत डॉॅ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज संभाजीनगर निवृत्त प्राचार्य डॉ. दत्ता देशकर यांनी स्तंभलेखक विठ्ठल वळसे पाटील लिखित निसर्ग दाता पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी व्यक्त केले.

बकोरी, ता . हवेली येथील देवराई वनराई वृक्ष प्रकल्प व सेवा समर्पण सोशल फाउंडेशन वतीने बकोरी वनराई प्रकल्पामध्ये निसर्ग दाता या पुस्तकाचे प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी माहिती सेवा समिती राज्याध्यक्ष चंद्रकांत वारघडे होते.
यावेळी बोलताना देशकर म्हणाले की, निसर्गाचे आपणच शत्रू आहोत. निसर्ग व भूगर्भातील होत असलेल्या बदलांमुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम झाले आहे. निसर्गाबाबत पुर्नविचार करून गावागावांतून जागरूक नागरिक पुढे आले पाहीजेत. निसर्ग दाता या वैचारिक ग्रंथातून निसर्गाची विविधता साधली आहे, हे पुस्तक पर्यावरण अभ्यासकांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे सचिन लोखंडे विस्तार अधिकारी भोर यावेळी बोलताना म्हणाले की, निसर्गा शिवाय जीवन अपुरे आहे, त्यामुळे निसर्ग संवर्धनासाठी प्रत्येकाचा हातभार मोलाचा आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे म्हणाले की, वाढता निसर्गाचा ऱ्हास हा पक्षी स्थलांतराला कारणीभूत असून देशी वृक्षरोपणाच्या माध्यमातून पशू, पक्षांना स्वावलंबी बनवण्याचे कार्य महत्त्वाचे आहे.

तसेच संत व समाज सुधारक विचार केंद्राचे संस्थापक उत्तमराव भोंडवे यांनी वाढत्या रासायनिक शेतीबाबत खंत व्यक्त केली.
यावेळी कार्यक्रमास मातृरक्षा प्रकाशन संस्थेच्या प्रकाशिका स्वाती इंगळे, शिक्रापूरचे माजी उपसरपंच व लेखक मयूर करंजे पाटील, पत्रकार दिपक नायक यांनी आपले विचार व्यक्त केले
कार्यक्रमाची सुरुवात वनराई मध्ये वृक्षरोपणाने करण्यात आली. प्रकाशन पहिली प्रत जेष्ठ पत्रकार स्व. के. डी. गव्हाणे यांची कन्या श्वेता गव्हाणे, मुलगा अभिजीत गव्हाणे, भाऊ विनोद गव्हाणे यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. निसर्ग दाता हा वैचारीक ग्रंथ ज्यांच्याकडे पत्रकारीतेचे धडे घेतले ते स्व. शिवसेना नेते अॅड. अविनाश रहाणे व जेष्ठ पत्रकार स्व. के. डी. गव्हाणे यांना अर्पण केल्याचे स्तंभलेखक विठ्ठल वळसे पाटील यांनी सांगीतले.
यावेळी शिरूर हवेली तालुक्यातील असंख्य पत्रकार सहकारी, निसर्ग संस्थांचे विविध पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक गणेश सातव तर आभार विठ्ठल वळसे पाटील यांनी मानले.





