गजानन गव्हाणे पाटील
आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या पुणे जिल्ह्यातील आणि शिरूर तालुक्यातील कोरेगाव भिमा ग्रामपंचायत विकास कामांचे पेक्षा इतर कामात व्यस्त असल्याने मागील गणपती आणि देवीच्या विसर्जन मिरवणुकीत बंद पडलेले स्ट्रीट लाईट सुरू करण्याची तसदी घेत नसल्याने ग्रामस्थ नाराज असून वेळी वेळी मागणी करून ही स्ट्रीट लाईट पूर्ववत होत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

गाव तसं चांगलं पण….. विकास कामांचे कुठेतरी वावगं अशी काहीशी परिस्थिती सध्या गावात पहावयास मिळत आहे. एकीकडे घरपट्टी, पाणीपट्टी, दिवाबत्ती कर भरण्यासाठी मोबाईल वर स्टेट्स ठेवण्यास अग्रेसर असलेले गावचे कारभारी आता कार्यकाळच्या अखेरच्या टप्यात आपल्या कामातून कुठेतरी काढता पाय घेत असल्याचे चित्र आहे. गावातील नवरात्री उत्सवाच्या दरम्यान विसर्जन मिरवणुकीत विसर्जन मार्गावरील आदर्श चौकातील स्ट्रीट लाईट बंद पडली. अनेकदा ग्रामस्थांनी सांगून ही ती सुरू करण्याची तसदी मात्र ग्रामपंचायत घेत नसल्याने या भागात रात्रीच्या वेळी अंधार पडतो. त्यातच लहान मुले, महिला या रात्री च्या वेळी अनेकदा कामानिमित्ताने बाहेर पडत असतात. त्यामुळे एकदा दुचाकी अथवा चारचाकी वाहन चालक यांना धडकला तर त्याला जबाबदार कोण ? असा सवाल विचारला जात आहे.

मागील काही वर्षांपासून कोरेगाव भिमा व परिसरात बिबट्या ठाण मांडून आहे. अनेकदा लहान जनावरे, वासरे, शेळी, कुत्री यांच्यावर हल्ला केल्याचे बातम्या कानावर येत असतात. त्यामुळे गावाचे बरोबरच वाड्या वस्त्यांवर देखील स्ट्रीट लाईट असणे आणि ते ही चालू महत्वाचे आहे. परंतु अल अमीन कॉलेज च्या भागात स्ट्रीट लाईट वाढविण्याची मागणी या भागातील जागृत नागरिक वेळोवेळी करत असतात. परंतु त्यांना देखील वाटण्याच्या अक्षता लावल्या जात आहे.
या परिसरातील बिबटे अनेकदा लोकांच्या नजरेस पडत असतात मग प्रशासन एखादा अपघात झाल्यावरच स्ट्रीट लाईट लावणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

तर दुसरीकडे दशक्रिया विधी कडे जाणाऱ्या मार्गावर देखील स्ट्रीट लाईट बंद असल्याने या भागातील नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच सार्वजनिक शौचालय याच अंधारात असल्याने महिलांना व विशेषतः लहान मुलांना या भागातून जाताना भीतीचे वातावरण आहे.
तरी ग्रामपंचायत प्रशासनाने ज्या बंद आहेत त्या स्ट्रीट लाईट आणि नव्याने काही भागात स्ट्रीट लाईट सुरू केल्यास त्याचा फायदा ग्रामस्थांना होणार आहे.





