गजानन गव्हाणे पाटील
गुरुदेव दत्त दिगंबर च्या जयघोषात आणि टाळ मृदुंगाच्या निनादात कोरेगाव भिमा (दत्तनगर), ता. शिरूर येथील श्री दत्त मंदिरात श्री गुरुदत्त सेवा मंडळाच्या माध्यमातून दत्त जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.
मागील तब्बल २६ वर्षांपासून या भागातील नागरिक एकत्र येत दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत असतात. या वर्षी देखील श्री दत्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई तसेच फुलांची सजावट करण्यात आली होती. पहाटे ५ वाजता काकडा तर त्यानंतर श्री दत्त मूर्तीचा शास्त्रोक्त पद्धतीने अभिषेक करण्यात आला. तसेच टाळ – मृदुंग, भगवे ध्वज तसेच अभंगाच्या साथीत तसेच कोरेगाव भिमा येथील माऊली भाजनी मंडळ, सिद्धेश्वर भजनी मंडळ, गुरुदत्त महिला भजनी मंडळ यांचे सोबत आळंदी देवाची येथील ह. भ. प.आत्माराम महाराज देवधरे यांचे ३० विद्यार्थी तसेच शेकडो भक्तगण या ग्रामप्रदक्षणेत सहभागी झाले होते.

सायंकाळी ५ ते ६.३० वाजता ह. भ. प. प्रकाश महाराज पाटील आळंदी देवाची यांचे कीर्तन व श्री दत्त जन्मोत्सव पाळणा म्हणत साजरा करण्यात आला. यावेळी फुलांची उधळण मंदिरात करण्यात आली.
श्री दत्त जयंतीचे औचित्य साधत गावातील उद्योजक सतीश मित्तल, राजाराम अगरवाल, प्रमोद देशमुख यांचे वतीने महाप्रसाद तर उद्योजक शांताराम शिवले यांचे माध्यमातून पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आला. या अन्नदान सोहळ्याचा हजारो भक्तांनी लाभ घेतला.
दत्त जयंती चे संपूर्ण नियोजन आणि व्यवस्थापन श्री गुरुदत्त सेवा मंडळ दत्त नगर यांचे वतीने करण्यात आले होते.





