गजानन गव्हाणे पाटील
विद्यालयाचा शैक्षणिक दर्जा उंचावत क्रीडा प्रकारात देखील विद्यालयातील विद्यार्थी चमकतात ही कौतुकास्पद बाब असून खेळाडू पुढे देखील विद्यालयाचे नाव उंचावतील असे प्रतिपादन छत्रपती संभाजी हायस्कूल चे स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष आणि उद्योजक रवींद्र फडतरे यांनी व्यक्त केले.
कोरेगाव भिमा, ता. शिरूर येथील फ्रेंड्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट च्या फ्रेंड्स इंग्लिश मिडीयम स्कूल मधील विद्यार्थिनी आराध्या आकाश काशीद हिने बारामती येथे झालेल्या शालेय कराटे स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल आयोजित कौतुक सोहळ्यात फडतरे बोलत होते.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे आयोजित राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धा २०२५ बारामती या ठिकाणी पार पडली. सदर स्पर्धेमध्ये १४ वर्षे मुलींच्या गटामध्ये शाळेची विद्यार्थिनी आराध्या आकाश काशीद हिने राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल कोरेगाव भिमा ग्रामस्थ व व्हॉईस ऑफ मिडिया चे वतीने आराध्याचा सत्कार करण्यात आला.

यावेळी विद्यालयाचे अध्यक्ष राजाराम ढेरंगे, सचिव दिलीप भोसले, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाला शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष बापूसाहेब शिंदे, व्हॉईस ऑफ मिडिया चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इरशाद शेख, माजी चेअरमन बबुशा ढेरंगे, उद्योजक संतोष काशिद, आकाश काशिद, विद्यालयाच्या उप मुख्याध्यापिका अजिता नायर, क्रीडा शिक्षक सागर दरेकर आदी मान्यवर, शिक्षक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
भविष्यात विद्यालयाचा शैक्षणिक दर्जा टिकविण्याचे बरोबरच विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात देखील भरीव कामगिरीसाठी विद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहील असे प्रतिपादन माजी उपसरपंच आणि फ्रेंड्स एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष राजाराम ढेरंगे यांनी व्यक्त केले.





