Smile & Stay Young’ मध्ये कला-योग-प्रेरणेचा उत्सव
कोरेगाव भिमा : प्रतिनिधी
भारतीय जैन संघटना विद्यालय, वाघोली येथे उच्च माध्यमिक विभागात बालदिन अत्यंत उत्साहात, आनंदमय वातावरणात आणि कलात्मकतेच्या उंचीवर साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात अर्चना कुंजीर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मधुर स्वागतगीताने झाली. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बालदिन सोहळ्याचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
अवंतिका संगई यांनी प्रभावी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची रुपरेषा, उद्दिष्टे आणि बालदिनाचे महत्त्व स्पष्ट केले. प्राचार्य संतोष भंडारी यांनी कार्यक्रमासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना सदिच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांनी भक्तिरस ओतप्रोत भरलेले ‘विठू नामाची शाळा भरली’ हे अभंगगीत सादर करताच भक्तीभावाचे वातावरण पसरले. त्यानंतर ‘दिल की आशाएँ’ या गीतावर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त, ऊर्जायुक्त आणि सकारात्मक संदेश देणारे नृत्य सादर केले.
कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण ठरलेले Musical Clap Yoga सादरीकरण प्रीती डूबे आणि कोमल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सादर केले. ताल, समन्वय, संतुलन आणि शिस्त यांचा अप्रतिम संगम साधत विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली.

सिद्धी शिर्के आणि गणेश सोनवणे यांनी मनोगत व्यक्त करत बालदिनाचा भावनिक आणि प्रेरणादायी पैलू उजळून टाकला.
शिक्षक अनुराधा भद्रे आणि बाबासाहेब गव्हाणे यांनी मार्गदर्शनपर भाषण करून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार दिले.
विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. पांडुरंग पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर उपप्राचार्य पोपटराव गेठे यांनी अध्यक्षस्थान भूषविले. पवार सरांनी मुलांना मार्गदर्शनपर विचार मांडत बालदिनाचे महत्त्व अधोरेखित केले, तर अध्यक्षीय भाषणात गेठे सरांनी विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
आगामी पुरुष दिन साजरा करत विद्यालयातील सर्व पुरुष शिक्षकांचा उत्स्फूर्त सन्मान करण्यात आला. त्यांच्या ज्ञानदायी सहवासामुळे विद्यालयाची शैक्षणिक आणि सांस्कृतिक परंपरा अधिक संपन्न होत असल्याचे यावेळी विशेषतः नमूद करण्यात आले.

तसेच नीलिमा ब्रम्हेचा यांनी सादर केलेल्या “शाळा आमची छान होती…” या कवितेने कार्यक्रमाला साहित्यिक आणि भावनिक स्पर्श दिला.
कार्यक्रमाचे सुयोग्य आणि ओघवते सूत्रसंचालन राणी कळमकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन राधा मोरे यांनी केले. विद्यार्थ्यांना गोडखाऊ वाटप करून आनंदमय वातावरणात बालदिन कार्यक्रमाचा समारोप झाला.





