कोरेगाव भिमा : विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी कर्जमुक्त व्हावा, यासाठी सरकारला शक्ती आणि बुद्धी मिळो अशी प्रार्थना महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस तसेच पेरणे लोणीकंद जिल्हा परिषद गटातील उमेदवार प्रदीप वसंत कंद यांनी केले.
मराठवाड्यासह राज्यभरात पावसाळ्यात झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक संकट अधिक गडद झाले असून त्यातून मुक्ती मिळवून देणे अत्यावश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. काशी–अयोध्या देवदर्शन आशीर्वाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात प्रदीप (भाऊ) वसंतराव कंद यांनी गंगेच्या प्रवाहात दिवा लावून शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा संकल्प केला आणि काशी विश्वेश्वर व प्रभू श्रीरामचंद्र यांच्या चरणी प्रार्थना अर्पण केली.

दोन हजारांहून अधिक भाविकांच्या उपस्थितीत ही यात्रा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडली. यात्रेतील भाविकांनी काशी विश्वेश्वर, श्री प्रभू रामचंद्र, पवित्र गंगा आणि सरयू नदी स्नान तसेच हनुमानगढी दर्शनाचा दैवी अनुभव घेतला.
हिंदू धर्माच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या काशी विश्वेश्वर आणि प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मंदिरांचे दर्शन घेण्याचे स्वप्न हजारो भाविकांचे प्रदीप कंद यांच्या प्रयत्नातून साकार झाले. प्रदीप कंद यांनी धर्मपत्नींसह गंगेची आरती करून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.
संपूर्ण यात्रेत शिस्तबद्ध नियोजन, उत्कृष्ट व्यवस्था आणि सेवाभाव जाणवत होता. या यात्रेचा यशस्वी समारोप हडपसर येथे भक्तीमय वातावरणात झाला.





