गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भीमा ता. शिरूर येथील भीमा नदीवरील स्ट्रीट लाईट बंद असल्याने गणेशोत्सवात सातव्या दिवशी गणपती विसर्जन करण्यासाठी येणाऱ्या गणेश भक्तांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. ग्रामपंचायत प्रशासनाने याची दखल घेत तातडीने या ठिकाणचा विद्युत पुरवठा सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन गणेश भक्तांकडून करण्यात येत आहे.

येथील भीमा नदीच्या पात्रात आज सातव्या दिवशी अनेक कारखान्यांचे गणपती तसेच घरगुती गौरी गणपतीचे विसर्जन मोठ्या जल्लोषात दिवसभर करण्यात येत होते. आज सातव्या दिवशी होणाऱ्या गणपती विसर्जनासाठी असंख्य कामगार वर्ग देखील होता. त्यामुळे अनेक जण सायंकाळी काम संपल्यानंतर गणपती विसर्जन करण्यासाठी भीमा नदीचे पात्र देत होते. यामध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश होता. परंतु या ठिकाणी फक्त दोनच खांबांवर स्ट्रीट लाईट काही ठिकाणी कमी प्रमाणात असल्याने नदीपात्र परिसरात मोठा अंधार पसरला होता. अशातच गणेश भक्तांना गणपती विसर्जन करावे लागत होते.

नदी पात्रात च्या परिसरात अवघ्या दोनच स्ट्रीट लाईट सुरू असल्याने अशा अंधारात अनेक भक्तांना आपल्या वाहनांचे लाईट सुरु करून आरती म्हणण्याची वेळ आली आहे.
तसेच प्रत्यक्षात भीमा नदीच्या पाण्यात कोणत्या प्रकारचे विद्युत लाईट सुरू करण्यात आली नसल्याने अंधारातच गणेश भक्तांना गणपती विसर्जन करावे लागत आहे.
विद्युत पुरवठा कमी त्यातच गणेशभक्त रात्रीच्या अंधारात नदी पात्रात वाहत्या पाण्यात उतरत असल्याने एखादा मोठा अपघात या ठिकाणी घडला तर त्याला जबाबदार कोण ?असा सवाल गणेश भक्तांकडून विचारला जात आहे.





