गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भिमा, ता. शिरूर येथील भिमा नदी तीरावरील गणपती विसर्जन घाटावर तसेच परिसरात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरले असून याचा नाहक त्रास कोरेगाव भिमा व पंचक्रोशीतील तमाम गणेश भक्तांना आणि या भागातील नागरिकांना सहन करावा लागत आहे.

येथील भिमा नदीचे पाणी स्वच्छ असल्याने कोरेगाव भिमा, सणसवाडी, वाडा पुनर्वसन तसेच वाड्या वस्त्यांवरील अनेक लहान मोठी गणेश मंडळे तसेच हजारो घरगुती गणपतींचे मोठ्या उत्साहात भिमा नदीच्या पाण्यात विसर्जन करण्यात येते. मात्र अवघ्या काही दिवसांवर आलेल्या अनंत चतुर्थी च्या पार्श्वभूमीवर देखील ग्रामपंचायत ने या भागात कोणतीही स्वच्छता केली नसल्याने गणेशभक्तांनी नाराजी व्यक्त केली.

वास्तविक दीड दिवस, पाचवा दिवस तर आज सातव्या दिवशी भिमा नदीच्या पाण्यात गौरी गणपतींचे विसर्जन करण्यात येते.
मात्र भिमा नदीला जाणाऱ्या रस्त्यावरील ग्रामपंचायत च्या दुमजली शौचालयाचे परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा पडला असून याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर आलेले आहे. यामुळे अश्या घाणीतून गणरायाला विसर्जनासाठी नदी पात्रात घेऊन जावे लागत आहे. तसेच गणपती चे निर्माल्य नदी पात्रात गेल्याने नदी पात्र खराब होते. मात्र या ठिकाणी निर्माल्य ठेवण्यासाठी कोणतीही व्यवस्था आज सातव्या दिवशी देखील करण्यात आलेली नाही.

एकीकडे ग्रामपंचायत कडे स्वच्छता करण्यासाठी कर्मचारी असताना देखील नदी कडे जाणाऱ्या रस्त्यावर कचरा पडत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच किमान अनंत चतुर्थी च्या आधी तरी नदी किनाऱ्यावरील परिसरात निर्माल्य कलश, पुरेसा विद्युत पुरवठा, छोट्या गणेश भक्तांना नदी पात्रात न जाता यावे यासाठी बॅरीकेट उपाययोजना कोरेगाव भिमा ग्रामपंचायत ने कराव्या अशी अपेक्षा गणेश भक्तांचे कडून व्यक्त केली जात आहे.





