◆◆ एका वर्षाच्या कालवधीत ४ पुरस्कार मिळवून युनिट-६ ने उंचावली पोलीस दलाची प्रतिमा ◆◆
पुणे : प्रतिनिधी
उत्कृष्टपणे गोपनीय माहिती मिळवून अनेक गंभीर गुन्ह्यांचा उकल करून गुन्हेगारांवर वचक निर्माण केल्याबद्दल गुन्हे शाखा युनिट-६ ला ‘युनिट ऑफ द मंथ’ पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार पुणे शहरचे पोलीस आयुक्त अभिताभ गुप्ता यांचे हस्ते देण्यात आला. एका वर्षाच्या कालावधीत चार वेळा हा पुरस्कार मिळवून गुन्हे शाखा युनिट सहाने पोलीस दलाची प्रतिमा उंचावली आहे.
वाघोली गाव पुणे महापालिकेच्या समावेशाबरोबरच लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयात समाविष्ट करण्यात आले. त्यानंतर पोलीस आयुक्त अभिताभ गुप्ता यांनी परिसरात विविध ठिकाणी पोलीस चौक्या उभारल्या. त्याबरोबर गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी वाघोली येथे नव्याने गुन्हे शाखा युनिट-६ स्थापना केले. गुन्हे शाखा युनिट-६ कार्यरत झाल्यापासून एक वर्षामध्ये युनिट-६ च्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे अट्टल गुन्हेगारांची माहिती मिळवून लोणीकंद व लोणी काळभोर या दोन पोलीस स्टेशनच्या हद्दीत चांगलाच वचक निर्माण करून गुन्हेगारांवर जरब बसवला.
गुन्हे शाखा युनिट-६ चे पोलीस निरीक्षक गणेश माने व त्यांचे पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय कामगिरी केली. पुणे शहराचे पोलीस आयुक्त अभिताभ गुप्ता यांचे हस्ते उल्लेखनीय कामगिरीबद्दल युनिट-६ ला एका वर्षामध्ये ४ वेळा ‘युनिट ऑफ द मंथ’ पुरस्कार मिळाला आहे.
तसेच पोना रमेश मेमाणे, पोना कानिफनाथ कारखेले, पोना नितीन मुंढे यांनी उत्कृष्ठरित्या गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करून आरोपींना अटक केली. त्याबद्दल या तीन पोलीस अंमलदारांना देखील ‘बहिर्जी नाईक’ पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे.
{ वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय माहितीच्या आधारे विविध गुन्ह्याचा उकल केल्याबद्दल ‘बहिर्जी नाईक’ पुरस्कार मिळाला आहे. वरिष्ठांच्या हस्ते देण्यात आलेला पुरस्कार प्रोत्साहन देणारा असून पुरस्कारामुळे काम करण्याची उर्जा मिळते. – पोलीस अंमलदार (गुन्हे शाखा युनिट-६) }





