लोणीकंद : प्रतिनिधी
बकोरी येथील देवराई प्रकल्पात संस्थापक चंद्रकांत वारघडे यांच्या संकल्पनेतून घडणाऱ्या वसुंधरेने पांघरलेल्या हिरव्या शालीचा एक धागा विनण्याचे काम, वाघोली वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय लिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे.
या उपक्रमाद्वारे पोलिसांनी ‘एक झाड – एक श्वास’ या संकल्पनेला चालना देत नागरिकांनाही वृक्षारोपणासाठी प्रोत्साहित केले. देवराई प्रकल्पात आज लावलेली ही झाडे भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवे श्वास घेऊन येतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

सहाय्यक पोलीस निरीक्षक लिंगाडे यांनी सांगितले की, “केवळ कायदा व सुव्यवस्था राखणे एवढेच आमचे कार्य नाही, तर सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमात सहभाग घेणे हीसुद्धा आमची जबाबदारी आहे. तसेच वारघडे यांचे वृक्षसंवर्धनासाठी सुरू असलेल्या अतिशय उत्कृष्ट कार्याबद्दल लिंगाडे यांनी विशेष कौतुक केले व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
त्यावर उत्तर देताना वारघडे म्हणाले, “वृक्षसंवर्धनात पोलिसांचा सहभाग हा इतरांसाठी प्रेरणादायक आहे व पोलीस प्रशासन समाज प्रबोधनातही पुढाकार घेत आहे, हे अत्यंत स्वागतार्ह आहे.





