गजानन गव्हाणे पाटील
आपली परंपरा, रूढी, पालखी सोहळा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कळवा त्याचा आनंद घेता यावा यासाठी कोरेगाव भिमा, ता. शिरूर येथील छत्रपती संभाजी हायस्कूल मध्ये पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पालखी सोहळ्यात विद्यालयातील तब्बल ७७६ विद्यार्थी – विद्यार्थिनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते.

डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात टाळ, गळ्यात तुळशीची माळ आणि मुखात श्री विठ्ठलाचे नाव अशा भक्तिमय वातावरणात विद्यालयात पालखी सोहळा संपन्न झाला. यावेळी विद्यालयाच्या मैदानात घोड्यावर श्री विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्ती ठेवत मोठ्या भक्तिमय वातावरणात पालखी काढण्यात आली. यावेळी शिक्षक देखील विठुनामाच्या भक्तीत रमून गेले होते. मैदानात फेरी काढत विद्यार्थी विद्यार्थिनी आणि शिक्षकांनी फुगडी खेळण्याचा आनंद लुटला.

या पालखी सोहळ्यात श्री विठ्ठलाची वेशभूषा हनुमंत पवार या विद्यार्थ्यांनी तर आरोही शिनगारे, दुर्वा सुपेकर, वैभवी पडघम या विद्यार्थिनी रुक्मिणी च्या वेशभूषेत पालखी सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या.
विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद आडुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमनाथ पिचड, वर्षा वाजे, पुष्पलता गिरी, संभाजी कोल्हे, करण कुटेमाटे यांच्यासह इतर शिक्षकांनी पालखी सोहळ्याचे नियोजन केले.





