- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीण५३ वर्षांनंतर कोरेगाव भिमा येथील नरेश्वर तलावाचे खोलीकरण : गावकऱ्यांच्या एकीने साधला...

५३ वर्षांनंतर कोरेगाव भिमा येथील नरेश्वर तलावाचे खोलीकरण : गावकऱ्यांच्या एकीने साधला ‘तिहेरी विकास’

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भिमा, ता. शिरूर येथे महाराष्ट्रातील सर्वात भीषण ठरलेल्या १९७२ च्या दुष्काळात खोदलेल्या तलावातील गाळ काढण्यासाठी व खोलीकरणासाठी ५३ वर्षांनंतर एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे! “गावच्या सर्वांगीण विकासात एकी, गावच्या प्रति विकास कामात नेकी आणि आणखी बराच विकास बाकी” असा दृढ निश्चय करत कोरेगाव भीमा ग्रामस्थांनी नरेश्वर मंदिरामागे असलेल्या जल तलावाची पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी खोलीकरणाचे काम हाती घेतले आहे.
हे कार्य केवळ एक प्रकल्प नाही, तर ग्रामस्थांची दूरदृष्टी, एकजूट आणि गावासाठी काहीतरी करून दाखवण्याची जिद्द याचे प्रतीक आहे. कोरेगाव भिमाचे आदर्श सरपंच संदीप ढेरंगे व ग्रामपंचायत, महाराष्ट्र शासन, टाटा मोटर्स आणि नाम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने या तलावातील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.
नरेश्वर तलावाचे ‘तिहेरी’ फायदे: शुद्ध पाणी, समृद्ध शेती, वाढते पर्यटन, नरेश्वर येथील तळ्यातील गाळ काढून त्याची खोली वाढवल्याने कोरेगाव भिमा गावासाठी अनेक पटीने लाभ होणार आहेत :
१. शुद्ध पिण्याचे पाणी: जल जीवन मिशन अंतर्गत पाणी योजनेला मोठा फायदा होऊन ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होईल.
२. शेतीला समृद्धी: शेतकऱ्यांच्या विहिरीतील पाणी पातळी वाढेल, परिणामी येथील शेतीसाठी त्याचा मोठा उपयोग होईल आणि शेती अधिक सुजलाम् सुफलाम् होईल.
३. पर्यटनाला चालना: नरेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते आता तलावात आलेल्या पाण्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल, ज्यामुळे गावाच्या आर्थिक विकासालाही हातभार लागेल.
हा तलाव १९७२ साली भीषण दुष्काळानंतर खोदण्यात आला होता. ५३ वर्षांनंतर आता या तलावाच्या गाळ काढण्याच्या कामाला नाम फाउंडेशनतर्फे इंद्रजीत (काका) देशमुख यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे, तसेच वन विभागाचे अमोल सातपुते, निळकंठ गव्हाणे, गौरी हिंगणे आणि सोपान अनसुने यांचेही सहकार्य मोलाचे ठरले आहे.


यावेळी पंचायत समिती माजी सदस्य पि. के. गव्हाणे, घोडगंगा सहकारी साखर कारखाना माजी संचालक कैलास सोनवणे, अण्णासाहेब मगर बँकेचे संचालक राजाराम ढेरंगे, माजी चेअरमन पंडित ढेरंगे, माजी सरपंच अमोल गव्हाणे, अशोक काशीद, डिंग्रजवाडीचे सरपंच प्रकाश गव्हाणे, वाडा पुनर्वसनच्या सरपंच योगिता ढोरे, पोलीस पाटील नितीन ढोरे, वसंत गिलबिले, माजी उपसरपंच बाळासाहेब वाडेकर, ग्रामपंचायत सदस्य महेश ढेरंगे, शरद ढेरंगे, वंदना गव्हाणे, जयश्री गव्हाणे, शंकर गव्हाणे, कांताराम कडलक, पोपट ढेरंगे, राजाराम नळकांडे, नामदेव शिवले, शेखर गव्हाणे, संतोष बगाटे, सागर कापसे, ग्राम पंचायत कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
१९७२ च्या आठवणींना उजाळा : कष्टाचे जिवंत स्मारक
या निमित्ताने गावकऱ्यांनी १९७२ च्या भीषण दुष्काळाच्या आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी बारामाही वाहणारी भिमा नदी आटली होती. जनावरांचा चारा, घरातील अन्नधान्य सर्वकाही संपले होते. लोकांच्या डोळ्यात पाणी होते आणि पोटात भुकेचा ज्वालामुखी उसळला होता. सर्वजण हवालदिल झाली होती.
या भयावह परिस्थितीत तत्कालीन तालुक्याच्या साहेबाने नरेश्वर तलाव खोदण्याची योजना आणली. माजी पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ (पि. के.) गव्हाणे यांनी अत्यंत भावनिक शब्दांत सांगितले, “हिकडे तलाव खोदला जायचा आणि दुसरीकडे लेकर बाळांची पोटं भरायची. सुखडी, अन्नधान्य प्रसंगी पैसे मिळायचे, यामुळे आम्ही येथे कामाला यायचो. गावातील सर्व कुटुंब येथे राबवायची. हे तळे आमच्या गावच्या दुष्काळातील भयाण परिस्थितीचे स्मृतीस्थळ तसेच कष्टाचे ते जिवंत स्मारक आहे. येथे ग्रामस्थांच्या पूर्वजांनी गाळलेल्या घामाने आमची शेती पिकवली, आमची पिढी जगवली. आता पुन्हा तळे खोलीकरण हे गावच्या विकासाचे केंद्रबिंदू होणार आहे आणि गावाला शुद्ध पिण्याचे पाणी व परिसरातील शेतकरी सुखावणार आहेत.”
आदर्श सरपंच संदीप ढेरंगे यांची जिद्द आणि दूरदृष्टी –
आदर्श सरपंच संदीप ढेरंगे, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी वनविभागाच्या एक एकर जागेसाठी शासन दरबारी मोठा संघर्ष केला. गावाला शुद्ध पाणी मिळालेच पाहिजे या जिद्दीने त्यांनी जीवाचे रान केले. अहोरात्र शासनाचे उंबरठे झिजवत त्यांनी ही जागा मिळवली. “वनविभागाची जागा मिळूच शकत नाही” या ठाम विश्वासाला कृतीतून उत्तर देत त्यांनी अशक्य प्राय वाटणारे काम साध्य केले. जागा मिळाल्यावर फटाक्यांची आतषबाजी करत पेढे वाटून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. आता तळ्याची खोली वाढवण्यात येत असून, लवकरच गावाला शुद्ध पिण्याचे पाणी मिळेल, असा विश्वास ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page