गजानन गव्हाणे पाटील
*इवलीसे रोप लावियेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी..*
या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगाप्रमाणे वारीच्या वाटेवर गेल्या २४ वर्षापासून अविरत आणि अखंडपणे मानवता हाच विश्वधर्म हे ब्रीदवाक्य मानून आई प्रतिष्ठान च्या माध्यमातून चहा बिस्किट वाटपाचा उपक्रम सुरु असून उपक्रमाचे हे रोप्य महोत्सवी म्हणजेच २५ वे वर्ष होते, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडहून पंढरपूरकडे प्रस्थान करत असताना सन २००० साला पासून पिरचंद वर्मा यांच्या प्रेरणेतून या उपक्रमाला सुरुवात झाली.
मनोज कांकरिया, अमित वाघोलीकर, संदीप भोर, शैलेश सातव, कै. महेंद्र सातव यांनी या उपक्रमामध्ये सुरुवातीला केळी वाटपा पासून सुरुवात केल्यानंतर त्यामध्ये हळूहळू लाडू वाटप, पोहे, चिक्की वाटप असा उपक्रम वाढत गेला सन २००५ नंतर बीजीएस कॉलेजचे उपप्राचार्य किशोर देसरडा यांनी चहा वाटपाची संकल्पना सुचवून त्याबरोबर बिस्किट, रेनकोट, पावसाचा कागद, शबनम बॅग अशा वारकऱ्यांच्या उपयोगाच्या वस्तूचे वाटप सुरू करण्यात आले, अशा पद्धतीने विविध जडणघडणीतून पुढे वाटचाल करत असताना वारीच्या वाटेवर झाडे लावा झाडे जगवा ही संकल्पना सुरू असून वृक्षमित्र आणि बकोरी देवराईचे निर्माते चंद्रकांत वारघडे आणि दादा बाबाजी वारघडे प्रतिष्ठान चे माध्यमातून दरवर्षी एक लाख बियांचे वाटप वारकऱ्यांना करण्यात येत आहे.

डॉक्टर सुधा कांकरिया यांच्या माध्यमातून बेटी बचाव बेटी पढाव हा उपक्रम तसेच आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे, तसेच आई प्रतिष्ठानच्या माध्यमातून वर्षभरामध्ये रक्तदान शिबिर, गरजू विद्यार्थ्याना शालेय साहित्य वाटप, अनाथ मुलांसाठी रक्षाबंधन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, वृक्षरोपण असे विविध सामाजिक कार्यक्रम राबविण्यात येत असून प्रतिष्ठानचे मनोज कांकरिया, चंद्रशेखर लुंकड, अमित वाघोलीकर, सचिन जैन, राजू गवंडर, दीपक गर्जे,विनायक नाथ, प्रा, विजेंद्र गायकवाड, गजेंद्र गंधारे हे कार्य चांगल्या पद्धतीने पुढे नेत आहेत.
चहा वाटप कार्यक्रमासाठी ॲड. राजेंद्र उमाप (विश्वस्त आळंदी देवस्थान), निलेश कबीर महाराज विश्वस्त आळंदी देवस्थान तसेच वाघोली येथुन आवर्जून उपस्थित राहीलेले शांताराम कटके, सुजाता सातव, जयश्री सातव, पोपट सातव, विजय जाचक, ज्ञानेश्वर जांभळे अशा अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आणि चहावाटप कार्यक्रमात सहभाग घेतला.

सर्व मान्यवराचे आई प्रतीष्ठान वाघोली,दादा बाबाजी वारघडे प्रतिष्ठान बकोरी यांच्या माध्यमातून मनोज कांकरिया, चंद्रकांत वारघडे यांनी बेलाचे झाड देऊन सन्मान केला.
प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संवर्धनाचे काम केले पाहिजे, पर्यावरणामध्ये होणारे बदल थांबवायचे असेल आणि पुढच्या पिढीला जीवंत ठेवायचे असेल तर वृक्षारोपण केले पाहिजे, पाण्याची खोलवर गेलेली पाणी पातळी पुन्हा पुर्ववत करण्यासाठी पाणी अडविले पाहिजे अशा प्रकारचे आव्हान वृक्ष मित्र चंद्रकांत वारघडे यांनी वारकऱ्यांना केले दादा बाबाजी वारघडे प्रतिष्ठान बकोरी यांच्या माध्यमातून एक लाख देशी बियाणे वाटप करण्यात आले.





