गजानन गव्हाणे पाटील
शिरूर तालुक्यातील कोरेगाव भिमा येथील ग्रामपंचायत च्या माध्यमातून लावण्यात आलेल्या स्ट्रीट लाईट मागील काही दिवसांपासून चक्क दिवसाही सुरू राहिल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले असून सदर स्ट्रीट लाईट किमान दिवसा तरी बंद करण्याचे तसदी ग्रामपंचायत प्रशासन घेणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

कोरेगाव भीमा येथे गावातील प्रत्येक चौकात तसेच महत्त्वाच्या ठिकाणी ग्रामपंचायत च्या माध्यमातून स्ट्रीट लाईट लावण्यात आल्या. परंतु स्ट्रीट लाईट या रात्रीच्या बरोबरच दिवसादेखील सुरूच राहत असल्याने ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. एकीकडे ग्रामपंचायत कर वसुलीसाठी नागरिकांकडे तगादा लावत असताना याच करातून गावात विविध विकास कामे करण्यात येतात. परंतु या स्ट्रीट लाईट मागील काही दिवसांपासून सुरू असताना देखील ग्रामपंचायत कर्मचारी तसेच पदाधिकारी गप्प का असा सवाल सुज्ञ नागरिकांकडून विचारला जात आहे.

या ठिकाणी लावण्यात आलेल्या स्ट्रीट लाईट काही भागात बंद आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी या भागातील नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामोरा करावा लागत आहे. काही खांबावर दोन दोन – तीन तीन स्ट्रीट लाईट लावण्यात आल्या खऱ्या परंतु त्यातील काही स्ट्रीट लाईट बंद आहेत. या संदर्भात ग्रामपंचायतकडे अनेकांनी त्या सुरू करण्याच्या सूचना केल्या असल्या तरी देखील या मागण्यांना कुठेतरी वाटाण्याचे अक्षता लावण्याचे काम ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
तरी ग्रामपंचायत ने सदर स्ट्रीट लाईट किमान दिवसात तरी बंद करण्याची व्यवस्था करावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.





