गजानन गव्हाणे पाटील
पावसाळा सुरू होण्यापूर्वीच मान्सूनपूर्व पावसाने कोरेगाव भिमा ग्रामपंचायत च्या ढिसाळ नियोजनाची पोलखोल केली असून गटारे तुडुंब भरल्याने पायी जाणाऱ्या ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून ग्रामपंचायत प्रशासन आता तरी जागे होणार का ? असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे.
मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे कोरेगाव भीमा परिसरातील काही भागात पावसाचे पाणी जमा होत आहे. त्यातच सांडपाणी वाहन करणाऱ्या गटारांमध्येही पावसाचे पाणी येत असल्याने सदर पाणी पुणे नगर महामार्गाच्या जवळील संगम प्रतिष्ठान चे समोरील रस्तावर आल्याने येथून ये जा करणाऱ्या नागरिकांना तसेच या भागात राहणाऱ्या लोकांना अक्षरशः गटाराच्या पाण्यातून ये जा करावी लागत आहे.

या भागात दरवर्षी पावसाचे पाणी साचत असते तसेच येथील लोक ही अनेकदा ग्रामपंचायत कडे या गटारांची स्वच्छता करण्याची मागणी करत असतात. या भागात अनेकदा मागणी करून फक्त सेफ्टी टँक द्वारे सांडपाणी उपसले जाते. परंतु कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येत नाही. त्यामुळे या भागात नेहमीच पाणी साचत असते. तसेच मच्छरांची पैदास ही होते.
तरी ग्रामपंचायतने या गटारांची स्वच्छता करावी अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.





