श्वानामुळे वाचली तरुणी, बिबट्याने पळवला दारातील कुत्रा
गजानन गव्हाणे पाटील
शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्याचे नागरिकांना दर्शन होऊन कित्येक पाळीव जनावरांसह नागरिकांवर देखील बिबट्याने हल्ले केल्याच्या घटना घडलेल्या असताना नुकतेच पिंपळे जगताप मध्ये बिबट्याने थेट घराच्या दारात येऊन कुत्रा पळवला असून कुत्र्यामुळे तरुणी सुदैवाने बचावली आहे.


पिंपळे जगताप, ता. शिरुर येथील ग्रामपंचायत सदस्या दिपाली तांबे या नातेवाईकांच्या पूजेसाठी तर त्यांचे सासरे गावामध्ये गेलेले होते. सायंकाळच्या सुमारास दिपाली तांबे यांची भाची मोनिका आतमध्ये बसलेली होती. अचानकपणे घराच्या चारही बाजूला कंपाउंड असूनही उघड्या गेटमधून बिबट्या घरात येत दारामध्ये असलेल्या दोन कुत्र्यांपैकी एक कुत्र्याची शिकार करुन पळून गेला. मात्र दारामध्ये असलेल्या कुत्र्यामुळे मोनिका बचावली आणि घडलेला प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने निदर्शनास आला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिरुर वनविभागाच्या वनपरीमंडल अधिकारी गौरी हिंगणे, वन्यजीव बचाव पथकाचे शेरखान शेख, अमोल कुसाळकर, शुभम वाघ, पोलीस पाटील वर्षा थिटे यांसह आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
नागरिकांनी लहान मुलांना एकटे सोडू नये, शेतात जाताना येताना आवाज करावा, मोबाईलवर गाणी लावावी, रात्रीच्या वेळी बाहेर उजेड ठेवावा, लहान जनावरांना योग्य निवारा करावा असे आवाहन वनपरीमंडल अधिकारी गौरी हिंगणे यांनी केले तर वनविभागाने परिसरात पाहणी करत बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामपंचायत सदस्या दिपाली तांबे यांनी केली आहे.





