पोलीस बंदोबस्तात नगररोडलगतच्या अतिक्रमणांवर हातोडा ; नियम तोडणाऱ्या वाहनांवर जप्तीची कारवाई
गजानन गव्हाणे पाटील
वाघोलीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी झालेल्या बैठकीमध्ये कडक उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर अतिक्रमणांवर कारवाई करून सर्जिकल स्ट्राईकला पोलीस बंदोबस्तात सुरुवात झाली आहे. बुधवारी (दि.२९) अचानक कारवाईला सुरुवात झाल्याने नागरिकांमध्ये धावपळ झाल्याचे दिसून आले. त्याचबरोबर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करून वाहने पोलिसांनी जप्तीची कारवाई केल्याने वाहनासाठी पोलीस स्टेशनच्या बाहेर गर्दी झाली होती.
वाघोली परिसरातील मागील अनेक वर्षांपासूनची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या नियोजनातून मंगळवारी (दि. २८) पोलीस, पीएमसी, पीडब्लूडी, पीएमआरडीए व संबंधित विभागांची बैठक झाली. गंभीर समस्या सोडविण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, आमदार ज्ञानेश्वर कटके, अधिकारी व ग्रामस्थांनी महामार्गावर वाहतूक कोंडीबाबत पाहणी केली. त्यानंतर झालेल्या बैठकीमध्ये पोलीस आयुक्तांनी कडक शब्दात वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने, नियम तोडणारी वाहने, रस्त्यालगतची अतिक्रमणे यांवर सर्जिकल स्ट्राईक करून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. बैठकीनंतर त्याच दिवशी पोलिसांनी महामार्गालगतच्या अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्याबाबत सूचना केल्या होत्या.

दुसऱ्याच दिवशी वाघोली येथे पीएमसी, पोलीस व संबंधित यंत्रणांनी एकत्रित येत सर्जिकल स्ट्राईक करून केसनंद फाटा येथून अतिक्रमणांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. प्रशासन व पोलिसांचा फौज फाटा कारवाईसाठी रस्त्यावर उतरला होता. अचानक कारवाईला सुरुवात झाल्याने नागरिकांची धावपळ झाली. अतिक्रमण कारवाई होणारच असल्याने अतिक्रमण धारकांकडून फारसा विरोध झाला नाही.

आयुक्त कुमार यांनी वाघोलीत नियम तोडणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देऊन प्रसंगी वाहन जप्ती कारवाई करा परंतु वाहनचालकांना शिस्त लावा अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे अतिक्रमणावर सर्जिकल स्ट्राईक करीत असतानाच दुचाकी वाहन चालकांवर देखील वाहतूक पोलिसांनी सर्जिकल स्ट्राईक करून वाहन जप्ती बाबत कारवाई केली. त्यानंतर वाहन घेण्यासाठी आलेल्या नागरिकांची वाघोली पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठी गर्दी झाली होती.





