गजानन गव्हाणे पाटील
विविध स्तरावर, स्पर्धांमध्ये यश संपादन करून आपले स्वतः चे, परिवाराचे, गावाचे नाव मोठे करणाऱ्या विद्यार्थ्यांचा, नवनियुक्त अधिकाऱ्यांचा सन्मान करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य असून या मधून उद्याचे विजेते आणि अधिकारी मिळतील यासाठी ग्रामपंचायत चे वतीने यांचा येत्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती आदर्श सरपंच संदीप ढेरंगे यांनी दिली.

कोरेगाव भीमा, ता. शिरूर येथील विद्यालयातील विविध स्पर्धा, विविध परीक्षा यामध्ये यश संपादन केलेले गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व नव्यानेच प्रशासकीय पदांवर नियुक्ती झालेल्या अधिकारी – कर्मचारी यांचा सन्मान होणार आहे. तरी आपल्या कुटुंबातील, परिसरातील, गावातील अशा व्यक्तींची माहिती सरपंच, उपसरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य यांना तात्काळ देण्यात यावी असे आवाहन ग्रामपंचायत चे माध्यमातून करण्यात आले आहे.

यामुळे विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवलेल्या व्यक्तींचा गावाच्या वतीने आपणास सन्मान करता येणार आहे. तसेच दिनांक २६ जानेवारी रोजी संपन्न होणाऱ्या या कार्यक्रम सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आदर्श सरपंच संदीप ढेरंगे यांनी केले आहे.





