अभिवादन सोहळ्यासाठी आषाढी वारी सोहळ्याच्या धर्तीवर सुविधा पुरविण्यात येणार
गजानन गव्हाणे पाटील
पेरणे फाटा येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी आषाढी वारी सोहळ्याच्या धर्तीवर सुविधा पुरविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणांचे चोख नियोजन करण्यात आले असून, यंत्रणा सज्ज झाली आहे.
विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी दरवर्षी लाखो अनुयायी येत असून, गेल्या काही वर्षांपासून अनुयायांच्या संख्येत वाढ होत आहे. मंगळवार (३१ डिसेंबर) आणि बुधवार (एक जानेवारी) असे दोन दिवस होणाऱ्या सोहळ्यासाठी लाखो अनुयायी येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाकडून सुविधांचे नियोजन करण्यात आहे.

‘दर वर्षी आषाढी वारी सोहळ्यासाठी वारकरी आणि भाविकांच्या दृष्टीने ज्या सुविधा पुरविल्या जातात, त्याच धर्तीवर यंदाच्या विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यात अनुयायांसाठी सुविधा पुरविण्यात येणार आहेत. त्यासाठी महसूल विभाग, पोलीस विभाग, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी), राज्य परिवहन महामंडळ (एसटी), अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), समाजकल्याण विभाग, महावितरण, आरोग्य विभाग, माहिती व जनसंपर्क कार्यालय यांच्यासह विविध विभागांच्या साहाय्याने सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे.’
‘अनुयायांना विजयस्तंभाच्या परिसरापर्यंत प्रवास करण्यासाठी आणि पुन्हा नियोजितस्थळी जाण्या साठीची वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षा यंत्रणा या दोन गोष्टींचे नियोजन करण्यात आले आहे. बुधवारी ५७५, तर गुरुवारी एक हजार ७० मोफत बस ठेवण्यात आल्या आहेत. वाहनांसाठी ४५ ठिकाणी वाहनतळ निश्चित करण्यात आले आहेत. तसेच बसचे मार्ग निश्चित करण्यात आले असून, नियंत्रण कक्ष तयार करण्यात येणार आहे. महिला सुरक्षितता आणि इतर घटनांच्या अनुषंगाने प्रत्येक बसमध्ये सीसीटीव्ही कार्यरत करण्यात आले आहेत.
अनुयायांसाठी २७८ एकरावर ४५ ठिकाणी वाहनतळ उभारण्यात आले आहेत. ३८ हजार ७०० दुचाकी व चारचाकी, बस बसू शकतील एवढी वाहनतळाची क्षमता आहे. कार्यक्रम परिसरात एकूण २३ ओपीडी व ४३ रुग्णवाहिका उपलब्ध ठेवल्या आहेत. १८ खासगी रुग्णालय आरक्षित केली असून, २८६ बेड आरक्षित करण्यात आले आहेत, असे सांगून डॉ. दिवसे म्हणाले, कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिस बंदोबस्त ठेवणे, वाहतूक नियंत्रण करण्यासाठी, तसेच शांतता राखण्यासाठी, प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यासाठी १० हजार पोलिसांचा वापर करण्यात आला आहे.

‘नियोजनासाठी प्रत्येक विभागातील व्यक्तीची नेमणूक करून नियंत्रण समिती, राजशिष्टाचार समिती, नियोजन समिती, रंगमंच समिती, पास समिती, बुक स्टॉल समिती आदी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत, तर प्रमुख १७ अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
यंदाच्या सोहळ्यात अनुयायांच्या आरोग्याच्या दृष्टीने ‘आरोग्यदूत’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी दुचाकीवरील आरोग्यदूत तत्काळ आरोग्य सेवा देतील, तर आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य तपासणी कक्ष (ओपीडी), २३ आरोग्य केंद्रे, ४३ रुग्णवाहिका विविध ठिकाणी असतील. तसेच महिला व स्तनदा मातांच्या अनुषंगाने ९ हिरकणी कक्ष आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ७ ठिकाणी निवारा केंद्र उभारणी करण्यात आली आहे.





