गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भिमा येथील श्रीमंतयोगी वाद्य पथक यांचा सालाबादप्रमाणे वादक सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वर्षी पथकाच्या वतीने प्रत्येक वादकाचा सन्मानचिन्हाच्या बरोबर पिण्याची पाण्याची बाटली भेट देऊन सन्मान करण्यात आला. पथकाचे वैशिष्ट्य म्हणजे हे पथक वादक सन्मान सोहळा हा आपल्या पालकांच्या हस्तेच सन्मान चिन्ह स्वीकारून साजरा करत असते.

सोहळ्या दरम्यान वादकांचे सर्व पालक उपस्थित होते. वादकांबरोबर पथकाच्या वतीने पथकाला सहकार्य करण्याऱ्या मान्यवरांचा देखील सन्मान केला जातो. पथकामध्ये दर वर्षी कोरेगाव भिमा तसेच आजूबाजूच्या गावातील एकूण ७० हुन अधिक मुले वाद्य वाजवण्याचे काम करतात. तसेच पथकाने आजपर्यंत धाराशिव व पुणे जिल्ह्यातील अनेक गावात आपली कला सादर केलेली आहे.
अनेक स्तरातील मुले ह्या पथकात येतात. त्यामध्ये विशेषतः मुली व लग्न झालेल्या महिला यांचा जास्त सहभाग असतो. वयाच्या ५ वर्षापासून ते ४० वयोगटातील मुले, मुली पथकात वाजवण्यासाठी आहेत. वाद्य वाजविण्याचे बरोबरच आज रोजी पर्यंत पथकाने अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. त्यामध्ये वढु बु येथील माहेर संस्थेमधील मुलांबरोबर भाऊबीज, वढु बु येथील श्री छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ येथे दिवाळी पाडवा निमित्त दीपोत्सव, मतिमंद सेवाधाम विद्यालय येथील मुलांबरोबर रक्षाबंधन सेलिब्रेशन, कोरेगाव येथील जि. प. शाळेला ढोल साहित्य भेट असे अनेक कार्य पथकाने आजपर्यंत आपल्या मार्फत केलेले आहे.

ह्या वर्षी पथकाचे ९ वर्ष पूर्ण होत आहेत. तसेच ग्रामीण भागातील पुणे नगर रोडवरील हे पहिले ढोल पथक मानले जाते असे पथकाचे संस्थापक सागर गव्हाणे पाटील यांनी आपली लोकशाही शी बोलताना सांगितले. पुढील वर्षी पथकाच्या वतीने काही तरी अनोखा उपक्रम साजरा करू असे पथकाचे अध्यक्ष कालिदास शिंगाडे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धानोरे गावचे माजी उपसरपंच शांतीलाल भोसुरे यांनी केले. तर आलेल्या पालकांच्या वतीने वादकांचे स्वागत व पुढील वाटचालीस शुभेच्छा सुभाष पिंपळे यांनी दिल्या तसेच पथकाच्या वतीने उपस्थित मान्यवर व वादक यांचे आभार पथकाचे उत्कृष्ट ताशावादक कालिदास ढगे यांनी मानले.





