गजानन गव्हाणे पाटील
उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड, आंबेगाव यासह शिरूर-हवेली या तालुक्यांमध्ये गेल्या काही महिन्यांत बिबट्याचा वावर वाढला असल्याचे निदर्शनास आले आहे. यातून शेतकऱ्यांवर हल्ल्यासारख्या दुर्घटनाही घडल्या आहेत. याकरिता तातडीने उपाययोजना म्हणून बिबटे पकडण्यासाठी ३०० पिंजरे खरेदी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीद्वारे विशेष निधी तातडीने उपलब्ध करून दिला जाईल, त्यानुसार योजना करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा वनविभाग अधिकारी महादेव मोहिते यांना दिले असल्याची माहिती शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी दिली.
मुंबई येथे शिरूर-हवेली मतदार संघातील विविध मुद्यांबाबत आमदार कटके यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना निवेदन सादर केल्यानंतर तातडीची बाब म्हणून विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी सदर निर्देश दिले आहेत. यावेळी झालेल्या बैठकीस वनविभाग, महाविरतण आणि संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
याविषयी माहिती देताना आमदार कटके यांनी सांगितले की, पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागासह शिरूर-हवेली मध्येही बिबट्यांकडून होणारे हल्ले वाढले आहेत. ऊसशेती आणि लपण क्षेत्र असल्याने या भागातही बिबट्या दिसू लागले आहेत. शहरीकरणामुळे मानवी वस्ती वाढली आहे, यामध्ये बिबट्यांच्या वावरामुळे मानवी हल्ले वाढत आहेत. हे हल्ले रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत समस्या मांडली.
त्यानुसार वनविभागाने बिबटे पकडण्यासाठी ३०० पिंजऱ्यांची खरेदी करावी तसेच बिबट्या निवारा केंद्राची क्षमता तीन महिन्यांत १०० बिबट्यांची करावी. महावितरणने शेतकऱ्यांना दिवसा थ्री-फेज विद्युत पुरवठा करावा, मानवी वस्तीतील बिबट्यांचा शिरकाव होऊ नये याकरिता वनकर्मचाऱ्यांनी सतर्क रहावे आदी कामांना तातडीच्या मंजुऱ्या देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले असल्याचे कटके यांनी सांगितले.

वाघोलीजवळील गावांमध्ये बिबट्याचे दर्शन
वाघोली येथील भाडळे वस्ती परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी बिबट्याचे दर्शन झाले होते त्यावेळी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला होता. कोलवडी, मांजरी भागामध्ये बिबट्याचा वावर सातत्याने दिसून येत आहे. बिबट्याकडून जनावरांवर हल्ले झाले आहेत तसेच ग्रामस्थांना बिबट्या नजरेस पडला आहे. नुकतेच केसनंद भागामध्येदेखील बिबट्या दिसून आला आहे. याभागामध्ये वन विभागाने लक्ष ठेवून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करीत आहेत





