गजानन गव्हाणे पाटील
महाविकास आघाडीचे शिरूर हवेलीचे उमेदवार अशोक रावसाहेब पवार यांनी नुकतीच वढु बुद्रुक ता. शिरूर येथील छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळाचे दर्शन घेत आपल्या प्रचाराला सुरुवात केली. यावेळी त्यांच्या सोबत महाविकास आघाडीचे शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा चुरशीची होणार हे सर्वश्रुत असताना अशोक पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या नंतर मतदार संघातील प्रत्येक गावात जाऊन केलेल्या विकास कामांची माहिती मतदार राजाला देत असताना मतदार संघात माघार झाल्यानंतर खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी ही मुख्य लढत होणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

एकीकडे मागील दोन पंचवार्षिक निवडणुकीत शिरूर हवेलीचे प्रतिनिधित्व करत असताना अशोक पवार यांनी मतदारसंघातील प्रत्येक लहान मोठ्या गावात विकास कामाचा डोंगर उभा केला असताना त्यांच्या विरोधात शिवसेनेतून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले माऊली कटके हे निवडणुकीचे रिंगणात आहेत.

आज सकाळी श्री क्षेत्र वढू बुद्रुक या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र समाधी स्थळाचे दर्शन घेत अशोक पवार यांनी आपल्या प्रचाराचे रणशिंग फुकले. यावेळी त्यांच्यासोबत आजी – माजी सरपंच, उपसरपंच, पंचायत समितीचे सदस्य ग्रामस्थ तसेच महाविकास आघाडीचे असंख्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
प्रचार शुभारंभ झाल्यानंतर कोरेगाव भिमा, आपटी वाजेवाडी, पिंपळे जगताप, डिंग्रजवाडी, सणसवाडी आदी गावात जाऊन त्यांनी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेत केलेले विकासकामांची माहिती दिली.





