तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायत चा उपक्रम
गजानन गव्हाणे पाटील
गावाच्या विकासासाठी ग्राम प्रशासनाचे बरोबरच कर्मचाऱ्यांचे योगदान देखील महत्वाचे असून अशा कर्मचाऱ्यांच्या कामाची पावती देणे आमचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन सरपंच अंकिता भरत भुजबळ यांनी व्यक्त केले.

तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात दीपावली निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सरपंच बोलत होत्या. यावेळी उपसरपंच स्वाती लांडे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस, सदस्य विशाल आल्हाट, अर्जुन तोडकर आदी ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी आदर्श कर्मचारी म्हणून सागर सुभाष तोडकर यांचा सन्मान करण्यात आला.
ग्रामपंचायतच्या वीस कामगारांना एक महिन्याचा पगार बोनस, मिठाई, कपडे यांचे वाटप करण्यात आले. त्याच प्रमाणे दिव्यांग निधीतून ८८ लाभार्थ्यांना यावेळी प्रत्येकी २५०० रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांचे वैयक्तिक बँक खात्यावर जमा करण्यात आले असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस यांनी दिली तसेच अनिल जयवंतराव भुजबळ ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून कामगारांना साखरेचे वाटप करण्यात आले.

यावेळी अनिल भुजबळ यांनी सर्व ग्रामपंचायतचे आपले काम मनापासून करून गावच्या विकासात सहकार्य करावे असे आवाहन केले. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांचे प्रश्न यापुढील काळात मार्गी लावले जातील असे आश्वासन केले.

याप्रसंगी सरपंच अंकिता भुजबळ यांनी सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.





