कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील
गाव छोटे असो वा मोठे त्याचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे असून जो विकास करतो त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे. तसेच पुढील आठवड्यात गावाच्या सांडपाणी, शुद्ध पाणी पुरवठा व इतर कामासाठी संबंधित अधिकारी व गावचे कारभारी यांची बैठक घेऊ असे आश्वासन शिरूर हवेली चे आमदार अशोक पवार यांनी दिले.
वाडा पुनर्वसन, ता. शिरूर येथील सावतामाळी महाराज मंदिर व शनि मंदिरासमोरील दहा लाख रुपये किमतीचे सभागृहाचे भूमिपूजन आमदार अशोक पवार यांचे शुभ हस्ते पार पडले यावेळी आमदार बोलत होते. तसेच मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या संचालक पदी आमदार अशोक पवार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार राष्ट्रवादीचे तालुका सरचिटणीस प्रकाश बाबर व ग्रामस्थांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.
आमदार पुढे म्हणाले, की राज्यातील सर्वात मोठा मतदार संघ शिरूर असून यामध्ये अनेक मोठी गावे आहेत. दोन वर्षे कोरोनात गेल्याने अनेक विकास कामे रखडली होती. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तब्बल १० हजार कोटी रुपयांच्या आसपास १८ लेन असलेल्या पुणे नगर रस्त्याचे काम सुरू होणार असून वाघोली ते शिरूर रेल्वे मार्ग देखील या महामार्गावरून जाणार आहे. यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सदैव पाठपुरावा सुरू आहे. काम करत असताना नागरिकांनी देखील ठेकेदाराकडे जाऊन कामाची पाहणी करणे गरजेचे असून काम खराब होत असेल तर मला कळवा असे आवाहन ही यावेळी पवार यांनी केले. तर ३०० कोटी रुपयांच्या निधीच्या माध्यमातून कोरेगाव भीमा ते वढू बुद्रुक रस्ता तर वढू खुर्द ते वढू बुद्रुक व आपटी ते श्री क्षेत्र तुळापूर या गावांना जोडणाऱ्या पुलांचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे यावेळी अशोक पवार यांनी सांगितले. तर सरपंच नवनाथ माळी यांनी कमी कालावधीत गावाच्या दृष्टीने करण्यात आलेल्या विकास कामांचे यावेळी अशोक पवार यांनी विशेष कौतुक केले.
यावेळी सरपंच नवनाथ माळी, उपसरपंच सुरेखा ढोरे, कोरेगाव भीमाचे सरपंच अमोल गव्हाणे, शिरूर खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजेंद्र नरवडे, माजी सरपंच संदीप ढेरंगे, विकास सोसायटीचे संचालक अशोक गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य वसंत भोकटे, स्वाती माळी, वैष्णवी हत्ते, माजी सरपंच उज्वला पवार, माजी उपसरपंच सतीश पवार, राजेश हत्ते, रामदास नायकुडे, उद्योजक वसंत गिलबिले, सावता माळी मंडळाचे अध्यक्ष मोहन माळी, शिरूर तालुका राष्ट्रवादी सरचिटणीस प्रकाश बाबर, माजी ग्रा. पं. सदस्य चंद्रकांत माळी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय कुडेकर, माजी अध्यक्ष संपत माळी, मुख्याध्यापक मिडगुले, अशोक ढेरंगे, बाळासाहेब ढोरे, बबलु पंजाबी, विठ्ठल नायकुडे आदी समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्यांचे स्वागत माजी सरपंच सुरेश माळी यांनी केले. प्रास्ताविक तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष नितीन ढोरे यांनी तर आभार ह.भ.प. शंकर महाराज नायकुडे यांनी मानले.





