गजानन गव्हाणे पाटील
शिरूर हवेली मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे विद्यमान आमदार अशोक पवार यांनी शिरूर शहरात मोठे शक्ती प्रदर्शन करत आपला १९८ शिरूर विधानसभा मतदारसंघाचा उमेदवारी अर्ज शिरूर विधानसभेच्या निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर व सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांचे सोबत शिरूर चे खासदार डॉ. अमोल कोल्हे तसेच पारनेरचे खासदार निलेश लंके, शिवसेना माजी जिल्हा प्रमुख संजय सातव यांच्यासह शेकडो समर्थक उपस्थित होते.

मागील काही महिन्यांपासून शिरूर हवेली मतदारसंघ वेगवेगळ्या कारणाने चर्चेला आहे. यामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याच्या चर्चा होत्या. परंतु अखेर ते बारामती येथूनच निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे अशोक पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तसेच भाजपाकडून देखील इच्छुक उमेदवारांची चाचणी सुरू आहे. परंतु आज विद्यमान आमदार अशोक पवार यांनी निवडणूक अर्ज भरत आघाडी घेतली.

शिरूर लोकसभेनंतर पुन्हा शिरूर हवेलीच्या राजकारणामध्ये सक्रिय झालेले अशोक पवार मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये भेटीगाठी घेत मतदार संघात प्रचाराची जवळपास एक फेरी पूर्ण केली तसेच उमेदवारी अर्ज भरला असताना देखील त्यांच्या विरोधातील उमेदवार कोण हे आजही स्पष्ट झाले नसल्याने सुरू हवेली मतदारसंघांमध्ये आमदार अशोक पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये शिवसेनेतून नुकतेच अजित पवार गटात प्रवेश घेतलेले ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके किंवा भाजपाकडून जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या नावाची जोरदार चर्चा सध्या मतदारसंघांमध्ये चालू आहे.

परंतु कंद व कटके यांच्या उमेदवारीवर शिक्का मोर्तब झाले नसल्याने कुठेतरी अशोक पवार यांनी निवडणुकीत आघाडी घेतल्याचे चित्र आहे. शिरूर येथे उमेदवारी अर्ज भरताना ढोल ताशांच्या गजरात मोठे शक्तिप्रदर्शन यावेळी महा विकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आले.
यावेळी शिरूर हवेलीतील विविध गावातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, विविध विकास सोसायटी यांचे चेअरमन तसेच महा विकास आघाडी चे समर्थक यावेळी अशोक पवार यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





