मुंबई :
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे भारतीय वायू दलातर्फे सी-295 एअरक्राफ्टचे लँडिग आणि सुखोई-30 या एअरक्राफ्टचे फ्लायपास्टची यशस्वी चाचणी पार पडली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळवर भारतीय हवाई दलाकडून औपचारिक परिचालन करण्यात आलं. या नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासातील महत्वाचा टप्पा म्हणून भारतीय हवाई दलाने प्रत्याक्षिक योजना आखली. हा औपचारिक कार्यक्रम विमानतळाची तत्परता आणि परिचालन क्षमतांवर प्रकाश टाकतो. मार्च २०२५ पर्यंत व्यावसायिक विमानांचे परिचालन अर्थात विमानतळ सुरू होण्याच्या मार्गावर आहे.

जागतिक गर्जाच्या पायाभूत सुविधा असलेल्या या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टप्पा १ आणि २ मधून वार्षिक २ कोटी प्रवासी वाहतूक होणार असून ८० लक्षटन मालवाहतुकीची क्षमता आहे. मुंबई, कोकणासह पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रालाही मोठा फायदा या विमामतळामुळे होणार आहे.
या वेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार सुनील तटकरे, सिडको महामंडळाचे अध्यक्ष आमदार संजय शिरसाट, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार नरेश म्हस्के, आमदार गणेश नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मंदा म्हात्रे, आमदार महेश बालदी, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, नवी मुंबई मनपा आयुक्त कैलास शिंदे, उपायुक्त राहुल गेठे अन्य प्रशासकीय अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.





