शिरूर प्रतिनीधी : विनायक साबळे
रूबी हॉल क्लिनिक तर्फे शिरूर तालुक्यातील आपल्या पहिल्या कॅथ लॅबचे उद्घाटन करण्यात आले. मातोश्री मदनबाई धारिवाल हॉस्पिटलच्या कार्डियाक सेंटरमध्ये सुरू करण्यात आलेली ही अत्याधुनिक सुविधा टाटा मोटर्स आणि स्टेलांटिसचा संयुक्त सहयोग असलेल्या फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रा.लि (एफआयएपीएल) आणि ग्रांट मेडिकल फाऊंडेशन (रूबी हॉल क्लिनिक) यांचा सहकार्यात्मक उपक्रम आहे.
ही सुविधा म्हणजे शिरूर तालुक्यातील लोकांपर्यंत अद्ययावत हृदयरोग चिकित्सा पोहचविणे व त्याचबरोबर या भागात प्रतिबंधात्मक आरोग्याला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल आहे. ही सुविधा सुरू होण्याबरोबरच शिरूरमध्ये पहिल्यांदाच कोरोनरी अँजिओग्राम (सीएजी) प्रक्रिया करण्यात आली असून स्थानिक समुदायासाठी आरोग्यसेवेतील हा महत्त्वाचा टप्पा आहे.

ही कॅथ लॅब सुरू होण्याआधी शिरूर तालुक्यातील रहिवाशांना प्रगत हृदयरोग उपचार मिळण्यात अनेक आव्हानांचा सामना करावा लागायचा. अँजिओग्राम, अँजिओप्लास्टी, पेसमेकर्सचे रोपण यासारख्या तातडीच्या हृदय प्रक्रियांसाठी पुणे किंवा इतर शहरांमध्ये जाण्याचा लांबचा प्रवास करावा लागायचा. गंभीर स्थितीतील उपचारांना विलंब झाल्यामुळे धोका अधिक बळावायचा. स्थानिक पातळीवर अद्ययावत सुविधा नसल्यामुळे उपचारासाठी जाण्यास लागणारे अंतर आणि आर्थिक भारा व्यतिरिक्त हृदयासंबंधित तातडीच्या परिस्थितीत चांगले परिणाम मिळण्यासाठी वेळेवर उपचार देखील प्राप्त व्हायचे नाही. मात्र आता निदान व हृदयरोग उपचाराशी संबंधित प्रक्रियांसाठी प्रगत सुविधा सुरू झाल्याने शिरूर तालुक्यातील रूग्णांना आपल्या घराजवळच जीवनदायी उपचार मिळू शकतात,ज्यामुळे संबंधित जोखीम कमी होऊन बरे होण्याचा कालावधी देखील कमी होईल.
या कॅथ लॅबचे उद्घाटन फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रा.लि. (एफआयएपीएल) चे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश बवेजा आणि रूबी हॉल क्लिनिकचे विश्वस्त व फिजिशियन डॉ. सायमन ग्रांट यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी समारंभाला रूबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेहराम खोडाईजी, इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. सी. एन. मखळे, स्ट्रॅटेजी व बिझनेस डेव्हलपमेंट विभागाच्या प्रमुख न्याटली ग्रांट आणि हृदयरोग तज्ञ डॉ. हर्षल इंगळे आदी मान्यवरांसह आरोग्यसेवा क्षेत्रातील व्यक्ती, स्थानिक समुदायातील लोक उपस्थित होते.





