गजानन गव्हाणे पाटील
एकीकडे ध्वजारोहण करण्यावरून गावा गावांमध्ये राजकारण सुरू असताना कोरेगाव भिमा येथे मात्र सरपंच संदीप ढेरंगे यांनी स्वतःहून भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सेनानी कै. मारुती भिमाजी भांडवलकर यांच्या लढ्यातील कार्याचे स्मरण यांच्या कुटुंबाच्या हस्ते ध्वजारोहण करून समाजात आदर्श निर्माण केला.

७८ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्यानिमित्ताने कोरेगाव भिमा, ता. शिरूर येथे यावेळी कोरेगाव कोरेगाव भिमाचे सरपंच संदीप ढेरंगे, उपसरपंच सविता घावटे, अमोल गव्हाणे, माजी उपसरपंच गणेश कांबळे, सदस्य महेश ढेरंगे, केशव फडतरे, शरद ढेरंगे, वंदना गव्हाणे, मनीषा गव्हाणे, रेखा ढेरंगे, जयश्री गव्हाणे, अर्चना सुपेकर, कोमल खलसे , ग्रामसेवक श्रीकांत वाव्हळ आदी उपस्थित होते.

ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय यासह जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, फडतरे वस्ती शाळा, श्री छत्रपती संभाजी हायस्कूल, फ्रेंड्स शाळा, सनराईझ स्कूल, अल अमीन कॉलेज, विनर्स स्कूल, विद्या वर्धीनी स्कूल, पंढरीनाथ नगर , बौद्ध वस्ती , फडतरे वस्ती अंगणवाडी, नरेश्र्वर वस्ती शाळा, ढेरंगे वस्ती शाळा, शिल्पकार तरुण मंडळ, जय महाराष्ट्र तरुण मंडळ, विविध कार्यकारी सोसायटी, शंभूराजे प्रतिष्ठान, आदी १९ ठिकाणी ध्वजारोहण मोठ्या उत्साहात पार पडले.

यावेळी सरपंच संदीप ढेरंगे यांनी सांगितले की, सरपंच पद हे गावच्या सेवेसाठी व सर्वांगीण विकास करण्यासाठी असणारे पद आहे. त्यामुळे यात मानपान न पाहता सर्वच ग्रामस्थ हे सरपंच आहेत हीच आपली भूमिका आहे. यापुढील काळात ग्रामस्थांच्या मदतीने गावामध्ये नवनवीन योजना राबविण्यासाठी विविध शिबिर लावण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
देशासह गावच्या दृष्टीने स्वातंत्र्य सेनानिंचे योगदान मोठे
भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीत अनेकांनी जीवाची पर्वा न करता काम केले. त्यांच्या त्यागाचे स्मरण व्हावे यासाठी कोरेगाव भिमा येथील ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण स्वातंत्र्य सेनानी कै. मारुती भिमाजी भांडवलकर यांचे चिरंजीव बबन मारुती भांडवलकर यांच्या हस्ते करण्यात आले असून इतर गावांमध्येही ही परंपरा राबविण्यासाठी सरपंच परिषदेच्या माध्यमातून अभियान राबविण्यात येणार असल्याचे सरपंच संदीप ढेरंगे यांनी सांगितले.





