गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भिमा, ता. शिरूर येथील श्रीमंतयोगी वाद्य पथकाने सामाजिक बांधिलकी जपत सलग पाचव्या वर्षी “एक राखी दिव्यांगांसाठी” हा उपक्रम राबवत पिंपळे जगताप येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयातील विशेष विद्यार्थ्यांना श्रीमंतयोगी वाद्य पथकातील रणरागिणींनी सलग पाचव्या वर्षी राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.

सेवाधामच्या विशेष विद्यार्थ्यांच्या सह रक्षाबंधन साजरे करत विशेष विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे शैक्षणिक साहित्य व खाऊवाटप करुन विशेष विद्यार्थ्यांच्या चेह-यावर आनंद फुलविला. वाद्य पथकातील सर्व तरुण तरुणींनी विशेष विद्यार्थ्यांसह संवाद साधत त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

सेवाधामचे मुख्याध्यापक पवन कट्यारमल यांनी श्रीमंतयोगी वाद्य पथकातील भगिनीं ख-या अर्थाने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी आवर्जून येतात व सण साजरा करतात. यामुळे दिव्यांग मुलांकडे सकारात्मक पाहण्याचा संदेश या माध्यमातून दिला जातो.
श्रीमंतयोगी वाद्य पथकाचे संस्थापक सागर गव्हाणे यांनी आम्हाला दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत राखी पौर्णिमेचा सण साजरा करतांना खुप आनंद वाटतो. असे सांगितले तर दिव्यांग विध्यार्थ्यांसाठी काही वाद्य वाजवण्यासाठी हवे असतील तर पथकाच्या मार्फत देण्याचे काम करू असे आश्वासन दिले. तसेच हा उपक्रम आम्ही कायम करत राहू अशी ग्वाही दिली.
दिव्यांग मुलांच्यासोबत रक्षाबंधन साजरे करताना पथकातील काही भगिनींना अश्रू देखील अनावर झाले.

यावेळी पथकाचे संस्थापक सागर गव्हाणे, अध्यक्ष कालिदास शिंगाडे, उपाध्यक्ष योगेश ढगे, स्वप्निल गव्हाणे, आदेश गव्हाणे, भाग्येश खोले, कालिदास ढगे, कार्तिकेश कांबळे, तसेच पथकाच्या रणरागिणी, ज्ञानेश्वरी निकम, श्रद्धा पिंपळे, सलोनी राठोड, मिनल परब, साक्षी भुजबळ, अश्विनी भगत, संध्या कावडे, काजल पाटील आदी वादक उपस्थित होते. पथकाच्या वतीने कालिदास ढगे यांनी आभार मानले.





