गजानन गव्हाणे पाटील
गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने हिवरे कुंभार येथील जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालयात प्रत्येक आई ही आपली प्रथम गुरु असते याच हेतूने आईच्या प्रित्यर्थ गुरुपूजन व मातृ पूजन कार्यक्रम साजरा करण्यात आला. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या आईंना पाद्यपूजन करून, पाय धूवून हळदीकुंकाने, फुलांनी पायाचे पूजन करून सगळा संस्कार पूर्ण केला. तसेच एकमेकांना मिठाई भरून हा उत्सव साजरा करण्यात आला.

त्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने खूप छान पद्धतीने पालकांची त्या ठिकाणी खुर्चीवर बसण्याची व्यवस्था केली होती. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा राजश्री तांबे, उपाध्यक्ष जालिंदर थोरात व त्यांची सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच शाळेच्या मुख्याध्यापक अंजना चौधरी, सुनीता पलांडे, पंचरास सर, गोरडे सर, फंड सर,अश्विनी जाधव, लोंढे सर व एकनाथ खैरे यांनी नियोजन केले होते.

सदर कार्यक्रम शाळेमध्ये एका आगळ्यावेगळ्या स्वरूपामध्ये साजरा करण्यात आला. त्यासाठी इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व माता शाळेत हजर होत्या. त्यानंतर छोटीशी बालसभा झाली. बालसभेमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या आई विषयी कृतज्ञता व्यक्त केली. बऱ्याचशा मातांनी कार्यक्रमाविषयी खूप छान भावना व्यक्त केल्या. शेवटी खाऊ वाटून कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील फंड यांनी केले तर आभार सचिन लोंढे यांनी मानले.





