देठे कुटबियांची घरी जाऊन भेट, तातडीची मदत
वाघोली : प्रतिनीधी
तरुणानो शेवट पर्यंत लढा द्यायला शिका. आत्महत्या हा यावरचा पर्याय नाही. संघर्ष हा सुरूच ठेवावा लागतो. आरक्षणाचा लढा सुरूच आहे. अशी टोकाची भूमिका घेवू नका. असे कळकळीचे आवाहन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आज केले.

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या देठे कुटुंबीयांची त्यांनी आज घरी वाघोली येथे भेट घेतली. यावेळी त्यांच्या वतीने मदतीसाठी तातडीचा पाच लाख रुपयांचा धनादेश दिला. तसेच मुलांचे पालकतत्व स्वीकारत असल्याचे त्यांनी जाहीर केले.
मूळच्या बार्शी येथील व सध्या वाघोलीत वास्तव्यास असणाऱ्या प्रसाद भागवत देठे या तरुणाने बुधवारी मराठा आरक्षणासाठी गळफास घेवून आत्महत्या केली. सावंत यांनी त्यांच्या पत्नी व तीन मुलांची वाघोलीत घरी येवून भेट घेतली.
ते पुढे म्हणाले, आतापर्यंत अनेकांनी आरक्षणासाठी आत्महत्या केल्या. मात्र त्यांचे कुटुंब उघडे पडले. आज त्यांची काय अवस्था आहे. हे पाहणे गरजेचे आहे. आपण दोन दिवस त्या कुटुंबीयांकडे जातो. नंतर त्यांच्याकडे कोणीही पाहत नाही. कुटुंब उघड्यावर पडते. कोणत्याही बाबी साठी संघर्ष करत असताना धीर ठेवावा लागतो. शेवट पर्यंत लढा द्यावा लागतो. आरक्षणाचा ही लढा सुरू आहे. तरुणांच्या अशा आत्महत्येने हा प्रश्न लगेच सुटणार नाही. समाजसेवेची आवड असणाऱ्या व झगडणाऱ्या प्रसाद सारख्या योध्याने आत्महत्या करावी ही चांगली बाब नाही. उलट अशा संघर्ष करणाऱ्या तरुणांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला पाहिजे.
माझ्या पतीचे व आमच्या वडिलांचे बलिदान व्यर्थ जाता काम नये. अशी अपेक्षा देठे यांच्या पत्नी व मुलांनी यावेळी व्यक्त केली. आरक्षणाचा काहीच निर्णय होत नाही यामुळे खूपच हताश झाल्याने त्यांनी आत्महत्या केली. मात्र हे चुकीचेच आहे. अशी भावना ही त्यांच्या पत्नीने व्यक्त केली.

याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, चंद्रशेखर घाडगे, राजेंद्र कुंजीर, शनी शिंगारे, शेखर पाटील, गणेश दाभाडे, ज्योती सातव आदी उपस्थित होते.





