भोर प्रतिनीधी : दीपक पारठे
भोर महाड मार्ग हा भोर वरून महाड कडे जाणारा जवळचा रस्ता असून या रस्त्यावर वाहनांची नेहमीच वर्दळ चालू असते तसेच निसर्ग रम्य पर्यटन स्थळे पाहण्यासाठी देखील आवर्जून पर्यटक येत असतात परंतु भोर महाड मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना कसरत करून वाहन चालवावे लागत आहे.

भोर महाड मार्गावर मागील दोन वर्षापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी दरडी देखील कोसळल्या होत्या. त्यांचा राडारोडा देखील अजूनही रस्त्यावर दिसत आहे. तसेच निगुडघर ते वाघजाई घाट दरम्यान ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना तसेच प्रवाशांना याचा नाहक त्रास होत आहे. तसेच वारवंड येथे रस्त्याला मोरी टाकून नवीन काम केले असताना देखील येथे रस्त्यावर पाणी साचल्यामुळे रस्त्याला तलावाचे स्वरूप आल्याचे निदर्शनात आले आहे.

रस्त्याला खड्डे पडल्यामुळे टायर फुटून तसेच इतर कारणांमुळे अपघात झालेल्या घटना घडल्या आहेत तसेच अजून अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सदर रस्त्याला पडलेले खड्डे संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर बुजवावे अशी मागणी वाहन चालक व प्रवासी यांच्याकडून होत आहे.





