गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भिमा येथे पुणे नगर महामार्ग लगत असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात पहिल्याच पावसात पावसाचे पाणी साचल्यामुळे नागरिकांची व या भागातील व्यवसायिकांची मोठी धांदल उडाली असून ग्रामपंचायत प्रशासनाने या तुंबलेल्या पाण्यासाठी योग्य ती उपाय योजना करावी अशी जोरदार मागणी या भागातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
काही दिवसांपूर्वी पुणे नगर महामार्गाचे काम करण्यात आले. महामार्गाची उंची वाढल्याने पावसाचे पाणी थेट दोस्ती चौक ते पीएमटी बस स्टॉप या भागात जमा होऊ लागले. फुट भर पाणी रस्त्यावर जमा होत असल्याने यातून वाट काढत या भागातील रहिवाशांना पुढील काही दिवस प्रवास करावा लागत आहे. घराशेजारील भागात पावसाचे पाणी साचत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मच्छरांची पैदास होत असून याच्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच या पावसाच्या पाण्यात गटाराचे दुर्गंधीयुक्त पाणी मिसळत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा दुहेरी प्रश्न निर्माण झाला आहे.

या भागातील तुंबलेल्या गटारांचा प्रश्न ग्रामपंचायत प्रशासनाने मार्गी लावावा यासाठी या भागातील नागरिक व्यावसायिक प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करत आहेत. परंतु दरवर्षी या भागात पावसाचे पाणी साचत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.
तरी ग्रामपंचायत प्रशासनाने पावसाळा सुरू होण्यापूर्वी या भागात पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे





