गजानन गव्हाणे पाटील
वाडा पुनर्वसन (कोरेगाव भीमा), ता. शिरूर येथील नक्षत्र सोसायटीमध्ये आज सकाळच्या सुमारास मध्यमवयीन युवकाचा ऑनलाइन गेम ॲप च्या कर्जबाजारीपणामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अतुल सुरेश पाटील (वय ३५ वर्ष रा. नक्षत्र हाऊसिंग सोसायटी) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून याबाबत मृत व्यक्तीचा मोठा भाऊ किशोर सुरेश पाटील याने पोलिसांना खबर दिली.
या संदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अतुल पाटील हा त्याची पत्नी भावना व दोन मुलींसह नक्षत्र सोसायटीमध्ये राहत होता तसेच रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये करारो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड येथे कामाला होता. अतुल हा ऑनलाइन गेम च्या जाळ्यात अडकल्याने त्याचे पैसे गेम मधून विड्रॉल होत नव्हते तसेच इतर मित्रांकडून घेतलेल्या रकमेचे टेन्शन असल्याचे त्याने त्याच्या रूम शेजारी राहणाऱ्या रामचरण कुमावत याला सांगितले होते.
आज सकाळी च्या वेळी रामचरण कुमावत यांनी खिडकी मधून अतुल हा घरातील कपडे वाळवण्याच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या केल्याचे दिसल्याने त्यांने याची माहिती अतुलचा मोठा भाऊ किशोर पाटील याला दिली.
ऑनलाइन गेम मधून पैसे विड्रॉल होत नाहीस तसेच मित्रांकडून घेतलेले उसने पैसे देता येत नसल्याने या नैराश्येपोटी आत्महत्या केल्याचे चर्चा सध्या सुरू आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अविनाश थोरात करत आहेत.

शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील ऑनलाईन गेम च्या माध्यमातून झटपट पैसे कमावण्याच्या नादात अनेक युवक या ऑनलाइन गेमच्या जाळ्यात अडकत चालले असून यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. सध्या ग्रामीण भागातील अनेक चौकांमध्ये फ्री वाय-फायचे नेटवर्क मिळत असल्याने अनेक युवक ऑनलाईन गेम मध्ये पैसे गुंतवून जास्तीत जास्त पैसे आरामात मिळण्या साठी अशा ऑनलाइन गेम च्या जाळ्यात अक्षरशा ओढले जात आहे.





