गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भीमा ता. शिरूर येथील ग्रामस्थांना मागील काही दिवसांपासून दुर्गंधीयुक्त अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असल्याने येथील नागरिकांचा आरोग्याचा भीषण प्रश्न निर्माण झाला असून लाखो रुपये कराच्या माध्यमातून गोळा करणारी ग्रामपंचायत ग्रामस्थांना पिण्याचे शुद्ध पाणी देणार तरी कधी ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमध्ये व्यक्त केला जात आहे
मागे काही महिन्यांपूर्वी कोरेगाव भीमा येथे ग्रामस्थांना अशुद्ध पाण्याचा पुरवठा केला जात होता. परंतु मध्यंतरी काही दिवस चांगले पाणी आल्यानंतर पुन्हा एकदा ” येरे माझ्या मागल्या ” या उक्तीप्रमाणे येथील ग्रामस्थांना नळाद्वारे अत्यंत अशुद्ध दुर्गंधीयुक्त काळे पाणी सोडले जात असल्याने येथील नागरिकांना त्वचेच्या समस्या बरोबर अनेक आजारांना तोंड द्यावे लागत आहे.

एकीकडे स्मार्ट कोरेगाव भीमाच्या नावाने घोषणाबाजी होत असताना येथील ग्रामस्थांना पिण्याचे शुद्ध पाणीच नसेल हे स्मार्ट कोरेगाव भिमा नक्की आहे तरी कुठे असा प्रश्न यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केला. नळाद्वारे येणारे पाणी हे अशुद्ध असल्याबरोबर दुर्गंधीयुक्त आहे. याचा नाहक त्रास महिलांना होत असून घरातील भांडी धुवावी तरी कशी असा प्रश्न यावेळी महिलांकडून व्यक्त केला जात आहे.
एकीकडे कोरेगाव भीमा येथे जत्रेचा उत्सव साजरा होत असताना अशुद्ध पाणी येत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. तरी यापुढील काळात तरी कोरेगाव भिमा येथे ग्रामस्थांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार का ? व कधी ? असा प्रश्न सर्वसामान्य कडून व्यक्त केले जात आहे.





