गजानन गव्हाणे पाटील
शेतकरी, सर्वसामान्य यांचे प्रश्न सोडविणे व महाराष्ट्राची अस्मिता दिल्ली पर्यंत पोहचविण्यासाठी मी उभा आहे. यामुळे ही लढत बदला विरुद्ध महाराष्ट्राची आस्मिता अशी आहे. आता मतदारांनीच योग्य विचार करावा असे आवाहन शिरूर मतदार संघाचे आघाडीचे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
शिरूर लोकसभा मतदार संघातील वाघोलीत, ता. हवेली येथे आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार यांच्याशी संपर्क साधला. या प्रसंगी आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार अशोक पवार, बाळासाहेब सातव उपस्थित होते.

डॉ. कोल्हे म्हणाले, आज आपल्या राज्यातील उद्योग बाहेरील राज्यात जात असताना राज्यातील लोकप्रतिनिधी एक ही शब्द बोलत नाहीत ही खेदाची बाब असून येत्या निवडणुकीत अश्यांना जनता धडा शिकवेल असा विश्वास व्यक्त केला.
कोरोना काळात केलेले विविध उपक्रम सांगत असताना महिलांच्या आरोग्यासाठी आरोग्याचे वान या उपक्रमात १५ हजार महिलांना फायदा झाला असल्याचे सांगितले.

शेतकरी व अनेक प्रश्नांवर भाजपचे सर्वच खासदार संसदेत कधीच बोललो नाही. त्यांनी केवळ मोदींचा जयजयकार केला. मी मात्र शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठविला. अनेक मोठी कामे मार्गी लावली. यापुढे मतदार संघात जी कामे मार्गी लावली ती प्राधान्याने पूर्ण करणे. पुणे नगर रोड, नाशिक रोड, शिक्रापूर चाकण रोडवरील एलिव्हेटेड कॉरीडोवरचे जे काम होणार आहे ते पूर्ण करणे. इंद्रायणी मेडीसीटी प्रकल्प पूर्ण करून घेणे. अशा अनेक कामाना प्राधान्य देणे हा माझा प्रथम अजेंडा आहे.
यावेळी तुतारी वाजविणारा मनुष्य या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गटाचे चिन्हांचे प्रकाशन करण्यात आले. तर महाराष्ट्रात जे राजकारण सध्या सुरू आहे. ते अतिशय वाईट आहे. मात्र महाराष्ट्रातील जनता अतिशय सुज्ञ आहे. ते गद्दाराना नक्कीच धडा शिकवतील. असा विश्वासही डॉ कोल्हे यांनी व्यक्त केला.





