गजानन गव्हाणे पाटील
लाखो रुपये महसूल असलेल्या शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील पुणे नगर महामार्गावरील स्ट्रीट लाईट मागील अनेक दिवसांपासून बंद असल्याने महामार्ग ओलांडताना सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करत असताना जीव मोठी धरून रस्ता ओलांडवा लागत आहे. तसेच स्ट्रीट लाईट बंद असल्याने अपघाताचे प्रमाणात देखील मोठी वाढ झाली असून ग्रामपंचायत प्रशासनाने बंद असलेली महामार्ग वरील स्ट्रीट लाईट तातडीने सुरू करावी अशी मागणी सर्वसामान्य ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
भीमा नदीच्या पुलापासून ते डिंग्रजवाडी फाट्यापर्यंत ग्रामपंचायतच्या माध्यमातून स्ट्रीट लाईट लावण्यात आली खरी परंतु याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष नसल्याने संबंधित स्ट्रीट लाईट अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. तर काही ठिकाणचे बल सुरू आहेत. स्ट्रीट लाईट बंद असल्याने रात्रीच्या वेळी महामार्गावरून ये – जा करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तसेच दोस्ती चौक येथे स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे रस्ता ओलांडताना ग्रामस्थांना एखादे वाहन उडवते की काय अशी भीती आहे.

एकीकडे स्मार्ट कोरेगाव विमा योजना गावात सुरू असून रस्त्यावरील स्ट्रीट लाईट बंद असल्याने स्मार्ट कोरेगाव असे का ? असा प्रश्न नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. तरी ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने पुणे नगर महामार्गावरील स्ट्रीट लाईट सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.





