गजानन गव्हाणे पाटील
शहरातील भरमध्यवस्तीत सुभाष चौक येथे मोटारसायकल वरुन आलेल्या अनोळखी दोन लोकांनी माजी नगराध्यक्ष अशोक कुलथे यांच्या दुकानात घुसून चोरीचा प्रयत्न केला. त्यावेळी चोरट्यांशी झटापट करत असणारे भिकाजी एकनाथ पंडित हे जखमी झाले आहेत. चोरट्यांनी गोळीबार ही केला असल्याने व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार शिरूर येथील सुभाष चौकात अशोक जगन्नाथ कुलथे सराफ या नावाचे माजी नगराध्यक्ष अशोक कुलथे यांचे दुकान आहे. त्या दुकानात भिकाजी पंडित हे ही कामाला आहे. आज दि. २८ रोजी संध्याकाळी साडेआठचा सुमारास मोटारसायकल वरुन मास्क घातलेले दोन जण दुकानात शिरले व चोरीचा प्रयत्न केला. यावेळी चोरट्यांशी प्रतिकार करणारे पंडित हे जखमी झाले. यावेळी चोरट्यानी गोळीबार ही केला. गोळीबारा नंतर चोरटे मोटारसायकल वरुन पसार झाले आहे. गोळीबाराचा आवाजाने परिसरात घबराट उडाली असून मोठ्या संख्येने नागरिकांनी कुलथे यांचा दुकानासमोर धाव घेतली .

पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून माहिती घेण्याचे काम सुरु होते. तर पंडित यांना शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.





