मराठा समाजाला ताकतीने मुंबईकडे येण्याचे केले आवाहन; वाघोलीकारांनी पहाटे केले स्वागत
गजानन गव्हाणे पाटील
मनोज जरांगे पाटील आरक्षणाच्या मागणीसाठी भव्य मोर्चा घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. त्यांचा मोर्चा भल्या पहाटे कडाक्याच्या थंडीत वाघोली येथे पोहोचला. पहाटे साडे चार वाजता वाघोली येथे पोहोचल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी एक तास जोरदार सभा झाली. यावेळी मनोज जरांगे यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर रोखठोक भूमिका मांडली. केसनंद फाटा येथे पहाटे साडे तीन वाजता जोरदार स्वागत वाघोली करांच्या वतीने करण्यात आले.
एक तास सुरु असलेल्या सभेत जरांगे यावेळी म्हणाले कि, ज्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत आणि आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांना आरक्षण देण्यात यावे. पोरं मोठी करायची असतील तर मुंबई गेल्याशिवाय पर्याय नाही. आपला बांधव आता मुंबईकडे निघाला आहे. वाघोली आणली चंदननगरमधील मराठा समाजाने ताकतीने मुबंईकडे चला. ताकदीने आंदोलन करा, पण उद्रेक नको”, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं.
आता ही लढाई आपल्याला जिंकायचीय. मराठ्यांच्या एकजुटीमुळे मराठ्यांचं कल्याण होणार आहे. सर्व मराठे माझ्यासारखे शांत आणि संयमी नाहीत, त्यांच्या नादी लागू नका. हे मराठ्यांची पोरं लय बेक्कार आहेत”, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
सामान्य मराठ्यांची ताकद दाखवायची वेळ आली’ “जगात सर्वात जास्त नोंदी मराठा समाजाच्या आहेत. आमच्या नोंदी सापडल्या आहेत. ज्यांच्या नोंदी नाहीत ते आरक्षणाचा लाभ घेत आहेत. आपल्या शासकीय नोंदी मिळल्या आहेत तरी आरक्षण मिळत नाहीत. म्हणून आता मुंबई जायचे. आपल्या विरोधात एक टीम काम करत आहे. त्यांना मराठा आणि ओबीसीमध्ये भांडणे लावायची होती. पण ते ही त्यांना जमले नाही. सामान्य मराठ्यांची काय ताकद आहे आता दाखवायची वेळ आली आहे”, असं जरांगे म्हणाले. ‘जो उद्रेक करेल तो आपला नाही’ “गरीब आणि श्रीमंताच्या मुलांचे एकच स्वप्न आहे पण ते आरक्षण नसल्याने हुकले. जसे पाणी महत्त्वाचे तसे आरक्षण महत्त्वाचे आहे. आता आपल्या विरोधात बोलणाऱ्यांनी बोलणे बंद केले. ७० वर्ष झाले, माझ्या जातीला फसवले आणि मूर्खात काढले. सरकारने मला शत्रू मानायला सुरुवात केलं. पण मी तुम्हाला भीत नाही आणि मोजीतही नाही. माझ्याकडे काहीच नाही, मी दुसऱ्याच्या गाडीत फिरतो. माझ्या घरावर सिमेंटपत्रे आहेत. मराठा जातीसाठी मी गोळ्या झेलायला तयार आहे. आंदोलन शांततेत करा जो उद्रेक करेल तो आपला नाही”, अशी तंबी जरांगेंनी आपल्या कार्यकर्त्यांना दिली.
मी समाजापुढे जात नाही आणि समाजही माझ्यापुढे जात नाही. थरकाप उडाला पाहिजे एवढ्या ताकदीने मुंबईला या. मुंबईत खिंड लढवताना गावाकडची खिंड तुम्ही लढवा. “रात्र-पहाट एकत्र करा, एवढीच संधी आहे. आता पाठीचा, पोटाचा त्रास होत आहे, बेल्ट लावावा लागतो. नेत्यांची पोरं मोठे करू नका, आपले काय ऊस तोडायला पाठवायचे का? आता आरक्षण भेटल्याशिवाय माघार नाही. आता लेकरांच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय मुंबईतून माघार नाही”, असं जरांगे म्हणाले.

गोवा, हरियाणा, राजस्थान, बिहारमधील मराठे एकत्र येणार आहेत. तुम्ही आम्हाला चार बाजूने घेरले तर आम्ही दाही बाजूने घेरु. मराठ्यांचे गणितं करणं आता सोपे राहिले नाही. आता घरी राहायचे नाही आणि मागे हटायचे नाही. सरकारने समाजाच्या भावना समजून घ्याव्यात. जर कोणाला काही झाले तर हा समाज कुणाच्याच हातात नाही”, असा इशारा जरांगे यांनी दिला. मागासवर्गीय आयोग आता रात्र दिवस काम करत आहे. मला माझ्या जातीचा स्वाभिमान आहे, आता माझा समाज एकत्र आला आहे. मुंबईकडे जाताना गाड्या एका बाजूने चालवा, गाड्यांमध्ये अंतर ठेवा, रुग्णवाहिकेसाठी रस्ता ठेवा. राजकीय भविष्य आणि कोणावर गुलाल टाकायचे हे मराठ्यांच्या हातात आहे, असं जरांगे म्हणाले.
वाघोलीतील मुक्कामानंतर सकाळी पुन्हा आगेकूच
वाघोलीत मुक्कामाच्या ठिकाणी भल्या पहाटे सभा घेतल्यानंतर अवघ्या काही तासांची विश्रांती घेऊन जरांगे पाटील व त्यांच्या सोबत असणारे पुन्हा सकाळी १० च्या सुमारास मुंबई दौऱ्यातील पुढील टप्प्यासाठी रवाना झाले. वाघोलीतून सकाळी पायी दौरा सुरु करून पुणे शहराच्या दिशेने रवाना झाले. यावेळी असंख्य मराठा बांधव मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी झाली होते.





