गजानन गव्हाणे पाटील
जय श्रीराम च्या जयघोषात संपूर्ण देशाचे बरोबरच कोरेगाव भिमा, ता. शिरूर येथील आदर्श चौकातील श्रीराम मंदिरात रामलल्ला च्या आयोध्येतील प्रतिष्ठापने निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवकांची संख्या मोठी होती. तर येथील युवकांनी संपूर्ण कोरेगाव भिमा येथील पुणे नगर महामार्गावर भगवे ध्वज लावल्याने संपूर्ण परिसर भगवा दिसत होता. तर आदर्श चौकात व परिसरात भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या.

येथील श्रीराम मंदिरात मागील अनेक वर्षांपासून रामनवमी साजरी करण्यात येते. आज ही रामलल्ला च्या प्रतिष्ठापने निमित्ताने आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. धार्मिक कार्यक्रमाचे निमित्ताने मंदिरात श्रीराम रक्षा स्त्रोत, हनुमान चालीसा पठण अभिषेक, भजन, महा आरती तसेच सायंकाळी दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता.


या कार्यक्रमासाठी गावातील तसेच पंचक्रोशीतील राम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. यावेळी अयोध्ये तून आलेल्या मंगल अक्षतांनी व फुलांनी श्रीरामाचा अभिषेक करण्यात आला. तसेच येणाऱ्या भाविकांना प्रसादाचे वाटप यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाचे पौरोहित्य महेश भवाळकर यांनी केले.





