शिक्रापूर प्रतिनीधी : विनायक साबळे
हवेली तालुक्यातील केसनंद ते वाडेबोल्हाई रस्त्यावरील एका हॉटेल समोरील झाडाला स्कूल बस धडकून अपघात अपघात झाला आहे. अपघात होताच चालक त्या ठिकाणाहून फरार झाला. जवळच असलेल्या नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेवून मदत केली. बसमध्ये १४ विद्यार्थी होते. यातील दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अपघातामुळे बसमधील विद्यार्थी भयभीत झाले.
मिळालेल्या माहितीनुसार सदरचा अपघात सोमवार दिनांक (४ डिसेंबर) रोजी सायंकाळी चारच्या सुमारास घडला. दरम्यान, ही स्कूल बस द रायझिंग स्टार स्कूल या शाळेची होती. स्टेरिंग लॉक झाल्याने अपघात घडल्याची माहिती शाळा प्रशासनाने दिली तर चालकाचा ताबा सुटल्याने अपघात घडल्याची माहिती लोणीकंद पोलिसांनी दिली आहे.

बसचा चालक बसमध्ये (क्रमांक एमएच-१२ एचबी २८३०) घेवून वाडेबोल्हाई-केसनंदकडे भरधाव वेगाने जात असताना एका हॉटेल समोर बस आल्यानंतर बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बसने जोराची धडक झाडाला दिली. यावेळी रस्त्याच्या कडेला भाजी विक्री करणाऱ्या सीताबाई नारायण ढोरे (वय ७०) यांच्या खुब्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर बस मधील दोन शाळकरी मुले जखमी झाली आहेत. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक पडसळकर करत आहेत.





