खराडीतील सभेलाही शेकडो वाघोलीकर जाणार ; वाघोलीच्या सकल मराठा समाज बांधवांची माहिती
गजानन गव्हाणे पाटील
मराठा आरक्षण मुद्द्यासाठी मनोज जरांगे पाटील यांची खराडी जवळील महालक्ष्मी लॉन्स येथे सोमवारी (दि. २०) सभा होणार असल्याने तुळापुर येथून सभास्थळी जात असताना जरांगे पाटील यांचे वाघोलीत जोरदार स्वागत केले जाणार आहे तसेच सभेलाही शेकडो वाघोलीकर उपस्थित राहणार असल्याचे वाघोलीतील सकल मराठा समाज बांधवांनी सांगितले. खराडी येथे सभेची जय्यत तयारी करण्यात येत आहे.
जरांगे पाटील यांनी राज्यभर दौऱ्याला सुरुवात केली आहे. त्यांच्या विविध ठिकाणी सभा सुरू आहेत. खराडी-वाघोली जवळील सभेला पुणे शहर व जिल्ह्यातून मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत. खराडी, चंदननगर, वडगाव शेरी, वाघोली येथील मराठा तरुणांनी एकत्रित येवून या सभेचे आयोजन केले आहे.

जरांगे पाटील हे १९ नोव्हेंबर रोजी आळंदी येथे मुक्कामी आहेत. तेथून ते दर्शन घेवून तुळापूर येथे येणार आहेत. तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळी नतमस्तक होवून खराडी येथील सभेला उपस्थित राहणार आहेत. या दरम्यान रस्त्यातील गावा गावात त्यांचा सत्कार होण्याची शक्यता आहे. सभेच्या ठिकाणी जोरदार तयारी सुरू आहे. सभेसाठी येणाऱ्या मराठा बांधवांच्या सोयीसाठी व सुरक्षेसाठी मराठा आयोजक, पोलीस व प्रशासन योग्य नियोजन करीत आहेत.
सभेला जाण्यापूर्वी वाघोली येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे जरांगे पाटील यांच्या हस्ते पूजन करून त्यांचा सत्कार करण्याचे नियोजन वाघोलीतील सकल मराठा समाज बांधवांच्यावतीने करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. जरांगे यांचा जंगी स्वागत करून सत्कार करण्यात येणार आहे. जरांगे पाटील यांच्या सभेला वाघोली व परिसरातील मराठा बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन वाघोली सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.





