- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणदीपावली निमित्ताने शुभेच्छा जाहिरात विशेष २०२५

दीपावली निमित्ताने शुभेच्छा जाहिरात विशेष २०२५

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
आपली लोकशाही हे आपले हक्काच्या मराठी न्यूज पोर्टल च्या माध्यमातून आमच्या सर्व वाचक, जाहिरात दार, आमचे प्रतिनिधी, हितचिंतक यांना सर्वप्रथम दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा!


दिवाळी किंवा दीपावली हा प्रकाशाचा हिंदू सण आहे, जो इतर रुपांत इतर भारतीय धर्मांमध्येही साजरा केला जातो. “अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे” प्रतीक म्हणून या सणाला ओळखतात. हिंदू चंद्रमास आश्विन (अमंता परंपरेनुसार) आणि कार्तिक या महिन्यांत म्हणजे सप्टेंबर आणि नोव्हेंबरच्या मध्यात दिवाळी साजरी केली जाते. हा उत्सव साधारणपणे पाच ते सहा दिवस चालतो. विविध धार्मिक कार्यक्रम, देवता आणि व्यक्तिमत्त्वांशी दिवाळी जोडलेली आहे, जसे की राक्षस राजा रावणाचा पराभव करून राम आपली पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह अयोध्येत परतले. समृद्धीची देवी लक्ष्मी आणि बुद्धीची देवता आणि अडथळे दूर करणारा देव गणेश यांच्याशी देखील व्यापकपणे हा सण संबंधित आहे. इतर प्रादेशिक परंपरा या सणाला विष्णू, कृष्ण, दुर्गा, शिव, काली, हनुमान, कुबेर, यम, यमी, धन्वंतरी, किंवा विश्वकर्मा यांच्याशी जोडतात. प्रामुख्याने हिंदू सण असला तरी दिवाळीचे विविध प्रकार इतर धर्मांचे लोक देखील साजरे करतात.


जैन लोक त्यांची स्वतःची दिवाळी पाळतात, जी महावीरांच्या अंतिम मुक्तिचे प्रतीक आहे. मुघल तुरुंगातून गुरू हरगोविंद यांची सुटका झाल्याबद्दल शीख लोक बंदिछोर दिवस साजरा करतात. तर पूर्व भारत आणि बांगलादेशातील हिंदू सामान्यतः देवी कालीची पूजा करून दिवाळी साजरी करतात.


या उत्सवादरम्यान लोक त्यांची घरे, मंदिरे आणि कार्यस्थळे दिवे, मेणबत्त्या आणि कंदीलांनी प्रकाशित करतात. हिंदू उत्सवाच्या प्रत्येक दिवशी पहाटे तेलाने स्नान करतात. फटाके आणि रांगोळीच्या सजावटीसाठी देखील दिवाळी ओळखली जाते. मेजवानी आणि मिठाई हा या सणाचा मुख्य भाग आहे. केवळ कुटुंबांसाठीच नव्हे तर समुदाय आणि विशेषतः शहरी भागातील लोकांसाठी दिवाळी म्हणजे वार्षिक एकत्र येण्याचा कालावधी असतो. शहरांतील उद्यानांमध्ये संगीत आणि नृत्य सादरीकरणासह सामुदायिक मेळ्यांचे आयोजन केले जाते. काही हिंदू, जैन आणि शीख लोक सणासुदीच्या काळात जवळच्या आणि दूरच्या कुटुंबांना दिवाळी ग्रीटिंग कार्ड आणि भारतीय मिठाई पाठवतात. सणाचा आणखी एक पैलू म्हणजे पूर्वजांचे स्मरण.

हिंदू, शीख आणि जैन लोकांसाठी दिवाळी हा एक प्रमुख सांस्कृतिक कार्यक्रम आहे. दिवाळीच्या सणाचा मुख्य दिवस (लक्ष्मीपूजनाचा दिवस) हा फिजी, गयाना, भारत, मलेशिया, मॉरिशस, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान, सिंगापूर, श्रीलंका, सुरीनाम, त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे अधिकृत सुट्टीचा दिवस असतो.


लक्ष्मी पूजन
आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन केले जाते. या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे. त्यामुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे, लक्ष्मी स्थिर रहावी म्हणून, स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष (विक्रमसंवत्) लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. महाराष्ट्रात लक्ष्मी पूजनाला भेंड, बत्तासे, साळीच्या लाह्यांचा नेवैद्य दाखवण्याची पद्धत आहे. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी लोक स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात.केरसुणीने घर स्वच्छ होवून घरातील अलक्ष्मी म्हणजे दारिद्य्र दूर होते असे मानले जाते.
प्राचीन काळी या रात्री कुबेरपूजन करण्याची रीत होती. कुबेर हा देवांचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो.

दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून त्याची पूजा करणे हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. परंतु गुप्तकाळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली. भारतात, विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत. त्यांमध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शविले आहेत. काही मूर्तींमध्ये कुबेर त्याची पत्‍नी इरितीसह दाखविला आहे. यावरून असे दिसते की प्राचीन काळी कुबेर आणि त्यांची पत्‍नी इरिती यांची पूजा केली जात असावी. कालांतराने इरितीचे स्थान लक्ष्मीने घेतले आणि पुढे कुबेराच्या जागी गणपतीला प्रतिस्थापित केले गेले.
अलक्ष्मी म्हणून ज्या देवतेला मध्यरात्री हाकलून देण्याची प्रथा आहे, तीच खरी या सणाची इष्ट देवता असल्याचेही म्हटले जाते. तिला ज्येष्ठा, षष्टी वा सटवी, निर्ऋती या नावांनीही ओळखतात. निर्ऋती ही सिंधू-संस्कृतीतील मातृदेवता समजली जाते. तिला ब्राह्मणी संस्कृतीने अलक्ष्मी म्हणून तिरस्कारले असले तरी ती राक्षसांची लक्ष्मी आहे असे देव मानत असल्याचे उल्लेख दुर्गासप्तशतीमध्ये आहेत.


लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने ‘आर्थिक व्यवहारातील सचोटी व नीती ‘ आणि ‘अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता’ अशी दोन महत्त्वाची मूल्ये मनात रुजतात, ही या पूजेची विशेषता आहे. भगवान महावीर मोक्षाला गेल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी महावीरांचे प्रमुख शिष्य गौतम गणधर यांना केवल ज्ञान प्राप्त झाले म्हणूनच दिवाळीच्या संध्याकाळी लक्ष्मीपूजन केले जाते ते संपत्तीरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी नव्हे, तर मोक्ष-लक्ष्मी किंवा आत्मकल्याणरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी. गणधर त्यांचा दिव्य-ध्वनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवितात. दिवाळीसाठी पूर्वी जमिनीवर आणि राजस्थानातील प्रथेप्रमाणे तांदळाच्या ओल्या पिठाची रांगोळी काढतात. त्याला ‘मांडणे’ असे म्हणतात. त्यावर पाट मांडून लक्ष्मीपूजन किंवा ओवाळणे आदी विधी केले जातात


बलिप्रतिपदा
कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो.हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ही ओळखतात. या दिवशी बळी राजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि ‘इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो’ असे म्हणतात. साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात व एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात व ते मडके शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात. काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा केली जाते.शेणाचा बळीराजा करण्याची प्रथाही अस्तित्वात आहे. या शेणाला “शुभा” असे म्हणतात. असा हा लोककल्याणकारी राजा बळी, त्याच्या पूजनाचा दिवस. या दिवशी विक्रम संवत सुरू होतो. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या कीर्द-खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. व्यापारी या दिवशी मुहूर्ताने व्यवहार सुद्धा करतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्‍नी पतीला औक्षण करते व पती पत्‍नीला ओवाळणी घालतो.

नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्‍नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच “दिवाळसण” म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात. दक्षिण भारतात या दिवशी बलीची प्रतिमा तयार करून ती गोठ्यात ठेवतात व तिची पूजा करतात. गायी – बैलांना रंग लावून रंग लावून व माळा लावून सजवतात. पाताणे प्रभू (पाठारे प्रभू) लोकांत बळीची अश्वारूढ प्रतिमा उंच जागी उभी करून तिच्या भोवती एकवीस दिवे मांडण्याचीही चाल आहे.

गोवर्धन पूजा
मथुरेकडील लोक बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा करतात. ते ज्यांना शक्य नसेल ते गोवर्धनाची प्रतिकृती करून त्याची पूजा करतात. अन्नकूट म्हणजे वास्तवात गोवर्धनाची पूजा होय. प्राचीन काळी हा उत्सव इंद्राप्रीत्यर्थ होत असे. पण वैष्णव संप्रदाय बलवान झाल्यावर इंद्रपूजेचे रूपांतर गोवर्धनपूजेत झाले. विविध प्रकारची पक्वान्ने आणि खाद्य पदार्थ तयार करून ते कृष्णाच्या मूर्तीच्या पुढे मांडणे व कृष्णाला त्याचा नैवेद्य दाखविणे याला अन्नकूट म्हणतात.

 

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

भाऊबीज
कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो.या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला “यमद्वितीया” असे नाव मिळाले असे मानले जाते. बंधु-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीच्या ताटात ‘ओवाळणी’ देऊन बहिणीचा सत्कार करतो. भावा-बहिणीच्या नात्याचा एक तरी सण प्रत्येक समाजात असतोच.

भाऊबीजेच्या दिवशी चित्रगुप्ताची पूजा होते. हा दिवस कायस्थ समाजाचे लोक चित्रगुप्ताची जयंती म्हणून साजरा करतात.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page