गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भिमा, ता. शिरूर येथे प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेअंतर्गत कार्ड नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली असून तीन दिवसात तब्बल दोन हजार नागरिकांनी या योजनेचा लाभ घेत कार्ड ची नोंदणी केली असून यापुढील काळात प्रत्येक प्रभागात आयुष्मान भारत कार्ड नोंदणी अभियान राबविण्यात येणार असल्याचे विद्यमान आदर्श सरपंच विक्रम गव्हाणे यांनी सांगितले.


कोरेगाव भीमा येथे प्राथमिक आरोग्य व ग्रामपंचायत कोरेगाव भीमा यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालयामध्ये प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेअंतर्गत कार्ड नोंदणी अभियान सुरू करण्यात आले. तीन दिवसात तब्बल दोन हजार जणांनी या अभियानाचा लाभ घेत कार्ड काढले.
यावेळी सरपंच विक्रम गव्हाणे, उपसरपंच गणेश कांबळे, माजी उपसरपंच नितीन गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य महेश ढेरंगे, माजी सदस्य सुरेंद्र भांडवलकर, संपत गव्हाणे, अविनाश गव्हाणे, ग्रामविकास अधिकारी रतन दवणे, आशा कर्मचारी मंगल खरात, अश्विनी फडतरे, सुनिता पाटील, वंदना गुंडाळ , ग्रामस्थ अन महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
या योजनेअंतर्गत लाभार्थींना देशात सरकारी आणि खासगी रुग्णालयात पाच लाखपर्यंत मोफत इलाज करता येतो.


कुटुंबातील व्यक्तीचे वय आणि संख्या यावर कोणतेही बंधन नाही. कोरेगाव भीमा येथील सर्व प्रभागांमध्ये या पुढील काळात ग्रामपंचायतच्या वतीने हा कॅम्प राबवला जाणार असून जास्तीत जास्त नागरिकांचे आयुष्मान भारत कार्ड काढून देण्याचे काम केले जाणार असल्याचे सरपंच विक्रम गव्हाणे यांनी सांगितले.





