लोणीकंद प्रतिनिधी: पी. मांजरे
लोणीकंद ता. हवेली येथे लोणीकंद थेऊर रोडवरील मगरवस्ती येथे गॅसचा वाहतूक करणारा टँकर मध्यरात्री १.४० वाजता पलटी होऊन अपघात झाला. सुदैवाने कुठलीही जिवीतहानी नाही. मात्र सुरक्षिततेच्या कारणास्तव या भागातील वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून बंद करण्यात आली आहे.

अपघात ग्रस्त गॅस टँकर हा लोणीकंद वरून थेऊरच्या दिशेने चालला होता. मगरवस्ती येथील असलेल्या वळणावर मध्यरात्री अचानक टँकर पलटी झाल्याने येथील नागरिकांमध्ये घबराट उडाली. अपघात झाल्यानंतर ड्रायव्हर, क्लिनर घटनास्थळावरून पळून गेले. येथील स्थानिकांनी पोलीस प्रशासनाला अपघात झाल्याचे कळविले. त्यानंतर घटनास्थळी लोणीकंद पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांच्या सूचनेनुसार पोलिस यंत्रणा पाठवून येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.

लोणीकंद पोलीसांनी निवेदनाद्वारे सुचित करण्यात आले घटनास्थळी दुसरा टँकर आला असून गॅस शिप्टींगचे काम चालू आहे. तरी गॅस शिफ्टिंग पूर्ण होईपर्यंत तसेच अपघातग्रस्त टँकर बाजूला हटवेपर्यंत लोणीकंद ते केसनंद रस्त्याने प्रवास करण्याचे टाळावे. तसेच परिसरातील नागरिकांनी घाबरून न जाता सहकार्य करावे. असे आवाहन करण्यात आले आहे.





