गजानन गव्हाणे पाटील
शिरूर तालुक्यातील कोरेगाव भिमा मध्ये मोठ्या उत्साहात वाजत गाजत व वरुणराजाच्या रिमझिम पावसाच्या सरीत पाचव्या दिवशी घरगुती गणपती, शाळा, आणि औद्योगिक विभागातील काही कंपन्यांनी आपल्या गणपती ला निरोप दिला. यामुळे कोरेगाव भिमातील महामार्ग गणेश भक्तांनी फुलून गेला होता. एकीकडे गणपती बाप्पा मोरया चा जयघोष तर दुसरीकडे रिमझिम पावसाने गणेश भक्तांचा उत्साह द्विगुणित झाला होता.


यंदा पावसाने महाराष्ट्रात दडी जरी मारली असली तरी गणपती स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून च मोठ्या प्रमाणावर पावसाने हजेरी लावली आहे. त्यातच मागील दोन दिवसांपासून सकाळचा उकाडा व सायंकाळी पावसाच्या सरी हा रोजचा अनुभव कोरेगांव भिमा मधील नागरिक घेत आहेत.




आज गणपती बसल्यानंतर पाचव्या दिवशी देखील कोरेगाव भीमा मध्ये दिवसभर पाऊस सुरू होता. या भर पावसात घरगुती गौरी गणपती, विविध शाळांचे गणपती व परिसरातील कारखान्यात बनविण्यात आलेल्या गणेश मूर्तींचे मोठ्या उत्साहात भिमा नदी मध्ये विसर्जन करण्यात आले.



यावेळी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी शिक्रापूर पोलिसांच्या माध्यमातून उत्कृष्ट नियोजन करण्यात आले तर पोलीस उपनिरिक्षक अविनाश थोरात, पो. ह. सचिन मोरे, प्रफुल्ल सुतार व पोलीस मित्र तसेच सहकारी भर पावसात आपले कर्तव्य निभावत असल्याचे चित्र पुणे नगर महामार्गावरील प्रत्येक चौकात दिसत होते.






