शिरूर : प्रतिनिधी
करिअर कट्टाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सक्षम होण्या बरोबरच करिअरचा विविध क्षेत्रातील संधी जाणून घेवून आपले करीअर घडविण्याचा दृष्टीने मार्गदर्शन होणार असल्याचे करीअर कट्टाचे प्रवर्तक यशवंत शितोळे म्हणाले.

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करीअर कट्टा या उपक्रमांतर्गत ‘ समन्वय संवादाची शंभरी’ या कार्यक्रमाचे आयोजन चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना करीअर कट्टाचे प्रवर्तक यशवंत शितोळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते होते.

शितोळे म्हणाले की करिअर कट्टा अंतर्गत विद्यार्थ्यांना ५० प्रकारचे कोर्सेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी जास्तीजास्त कौशल्ये आत्मसात करावीत जेणे करून या कौशल्यांचा आधारे करिअरच्या विविध संधी निर्माण होतील. विद्यार्थ्यांनी करीअर घडविण्याचा विविध संधी समजून व जाणून घेतल्या पाहिजेत. विद्यार्थ्यानी चांगल्या विधायक गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आपली संगत जशी असते तसे आपले व्यक्तिमत्व घडत असते. विद्यार्थी आपल्या बहुतांशी वेळ हा मोबाईल वर घालवितात. विद्यार्थ्याच्या कडील वेळ हा अमूल्य असून या अमूल्य वेळेचा उपयोग कसा करायचा हे ठरवून विद्यार्थ्यांनी मोबाईलचा आवश्यक तेवढा वापर करावा. आयुष्याचा जडणघडणीसाठी वेळेचा योग्य वापर आवश्यक आहे. आयुष्यातील वेळेचे योग्य नियोजन करून आपले करीअर कश्यात घडवायचे ते ठरवा. स्वप्ने पाहा व ही स्वप्ने साकार करण्यासाठी अखंड प्रयत्न करावेत असे सांगून शितोळे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की दर महिन्याला किमान एक पुस्तक वाचा, दर महिन्याला एक नवीन कौशल्य शिका, एका चांगल्या व्यक्तिमत्वाची भेट घ्या .

प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते यांनी यावेळी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाचा जडणघडणीसाठी सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देत करिअर संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयात स्थापन झालेल्या करीअर संसदेतील विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला तसेच माजी विद्यार्थिनी पूजा विलास पंदरकर एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होवून कर सहाय्यक व महसूल सहाय्यकपदी निवड झाल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. ए.डी.केत यांनी केले तर आभार प्रा. डॉ.एस.पी. बोरसे यांनी मानले.





