गजानन गव्हाणे पाटील
ज्ञानेश्वर कटके सोशल फाऊंडेशन मार्फत लहान मुलांसाठी वाघेश्वर मंगल कार्यालय, वाघोली येथे शाडू मातीपासून पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्ती बनविण्याची मोफत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून लहान मुलांना त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत मूर्ती बनविण्याचे व रंगविण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यशाळेत सर्वांना शाडूची माती पुरविण्यात आली असून यावेळी मुलांनी शाडू मातीपासून अतिशय सुंदर अशा पर्यावरणपूरक गणेश मुर्त्या मोठ्या उत्साहात साकारल्या. विशेष म्हणजे स्वतःच्या हातांनी बनविलेली बाप्पाची मूर्ती घरी विराजमान केली जाणार या गोष्टीचा खूप आनंद या लहानग्यांना होत होता.
पर्यावरण प्रदूषण टाळण्यासाठी शाडू मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख माऊली आबा कटके यांनी उपस्थित सर्व मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे आभार मानले. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी हा उपक्रम दरवर्षी हाती घेत असून निश्चितच पर्यावरण संरक्षणासाठी हा छोटासा हातभार लावता आला याबद्दल समाधान वाटते असे मत माऊली आबांनी व्यक्त केले.

या सोबतच उपस्थित सर्व पालकांनी सदर कार्यशाळा आयोजित करून मुलांचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित केल्याबद्दल ज्ञानेश्वर कटके सोशल फाऊंडेशनचे आभार मानले. या कार्यशाळेस मोठ्या संख्येने मुलांनी सहभाग नोंदवला आणि गणेश मूर्ती साकारण्याची कला अवगत केली.





